फिनले मिलमध्ये राडा
By Admin | Updated: July 7, 2014 23:20 IST2014-07-07T23:20:03+5:302014-07-07T23:20:03+5:30
येथील न्यू फिनले मिलमध्ये कामगार अधिकाऱ्याने कामावर रुजू होण्यासाठी आलेल्या महिलेचा हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी सोमवारी सकाळी संतप्त कामगारांनी मिलमध्ये काम बंद केले.

फिनले मिलमध्ये राडा
महिला कामगाराचा विनयभंग : कामगार अधिकाऱ्याला अटक
अचलपूर : येथील न्यू फिनले मिलमध्ये कामगार अधिकाऱ्याने कामावर रुजू होण्यासाठी आलेल्या महिलेचा हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी सोमवारी सकाळी संतप्त कामगारांनी मिलमध्ये काम बंद केले. अचलपूर पोलिसांनी त्या अधिकाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केल्यावर तणाव निवळला.
वसंत वानखडे (६०) असे आरोपीचे नाव आहे. त्याने नजीकच्या तळेगाव मोहना येथील एका महिला कामगाराचा कामावर रुजू होण्यासाठी आल्यावर स्वाक्षरी करीत असताना हात धरून विनयभंग केल्याची तक्रार अचलपूर पोलिसात आज सोमवारी दुपारी २ वाजता केली. पोलिसांनी फिनले मिलचे कामगार अधिकारी वसंत वानखडेविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली.
दीड वर्षांपूर्वीच
वानखडे सेवानिवृत्त
सदर महिला कामगाराशी ५ जुलै पूर्वी असभ्य वर्तन केल्याच्या तक्रारीतून पोलिसांनी अटक केलेला कामगार अधिकारी वसंत वानखडे हा दीड वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झाला होता. परंतु फिनले मिल प्रशासनाने रोजंदारीवर वानखडेला रुजू करुन घेतले होते, अशी माहिती मिल प्रशासनाने दिली. दरम्यान महिला कामगाराचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक व्हावी लागली.
लोकप्रतिनिधींची मध्यस्थी
फिनले मिलमध्ये संतप्त कामगारांच्या भावना लक्षात घेता अचलपूरचे आमदार बच्चू कडू, जि. प. अध्यक्षा सुरेखा ठाकरे, नगरसेवक अभय माथने, दीपाली विधळे, नितीन डकरे, किशोर कासार, सुधीर देशमुख, राजू माहुलकर आदींनी फिनले मिलमध्ये जाऊन कामगारांच्या संतप्त भावना जाणून घेतल्या व शांत राहण्याचे आवाहन केले.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
सोमवारी दुपारी १२ वाजतानंतर कामगार अधिकारी वसंत वानखडे याला अटक करण्याची मागणी करीत कामगारांनी पुन्हा आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. परिस्थितीचे गांभीर्य पाहता अचलपूरचे ठाणेदार बहादुरे, महिला पोलीस उपनिरिक्षक तिरपुडे, आखरे, येडके यांच्यासह पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.