मंत्रालयात रॅकेट; कागदपत्रांत फ्रॉड, अमरावतीच्या डेप्युटी आरटीओची सेवा समाप्त
By गणेश वासनिक | Updated: August 17, 2024 18:03 IST2024-08-17T18:02:12+5:302024-08-17T18:03:59+5:30
राज्याच्या गृह विभागाचा निर्णय, गठित समितीचा अहवाल, दोन जन्मतारखेच्या नोंदीमुळे सेवानिवृत्ती लांबली

Racket in Ministry; Fraud in documents, service of Deputy RTO of Amravati terminated
अमरावती : मूळ जन्मप्रमाणपत्र, शाळा सोडल्याच्या दाखल्यासह अधिवास ठिकाण बदलवून सेवापुस्तकात खाडाखोड केल्याप्रकरणी अमरावतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजकुमार वर्धेकर (बागडी) यांची राज्याच्या गृहविभागाने सेवा समाप्तीचा निर्णय घेतला आहे. किंबहुना कागदपत्रांत फ्रॉड असतानाही अधिकाऱ्यांना अतिरिक्त कर्तव्य सेवा आणि आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी मंत्रालयात रॅकेट असल्याचे आता स्पष्ट होत आहे.
राज्याच्या गृह विभागाचे अवर सचिव सुनील आपटे यांच्या स्वाक्षरीने १६ ऑगस्ट २०२४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार डेप्युटी आरटीओ राजकुमार वर्धेकर (बागडी) यांची प्रथम नियुक्ती ही वर्धा येथे झाली होती. बागडी यांचा खरा जन्म २२ सप्टेंबर १९६४ असा आहे. मात्र, त्यांच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संवर्गाच्या यादीत १ जानेवारी २०१८ ते १ जानेवारी २०२२ रोजीच्या सेवाज्येष्ठता यादीत जन्मतारीख २२ सप्टेंबर १९६६ ऐवजी २२ सप्टेंबर १९६५ करण्यासंदर्भात सादर केलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे बागडी यांनी शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला. बागडी यांच्या २२ सप्टेंबर १९६४ च्या जन्मतारखेनुसार ते ३० सप्टेंबर २०२२ रोजी डेप्युटी आरटीओ म्हणून सेवानिवृत्त होणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्या सेवापुस्तकात खाडाखोड आणि जन्मतारीख ही २२ सप्टेंबर १९६५ तसेच २२ सप्टेंबर १९६६ अशी नमूद असल्यामुळे ते अद्यापही सेवानिवृत्त झाले नाहीत. हा प्रकार म्हणजे शासनाची आर्थिक फसवणूक होय, असा गठित समितीचा अहवाल आहे.