वरूड : निवडणूक संपताच भारनियमनाचा कहर वाढला असल्याने शेतकऱ्यांचा रबीचा हंगाम धोक्यात आला आहे. दिवस-रात्र एक करुन पिकांचे ओलीत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भारनियमनामुळे रबी हंगामातील कपाशी, मिरचीसह संत्राचे पीक धोक्यात आले आहे. तालुक्यात शेतकऱ्यांना नियमीत वीज देण्याची मागणी केली आहे.वरुड तालुक्यावर निसर्गाची अवकृपा असल्याने कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाला येथील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. गारपिटीच्या नुकसानीमुळे येथील शेतकरी पूर्णत: खचला आहे. संत्रा आंबिया बहरावर संत्रा उत्पादकांनी समाधान मानले. परंतु पावसाने एक महिन्यापासून दडी मारल्याने शेतातील कपाशी, मिरची, सोयाबीन, तूर सुकायला लागली तर संत्रा फळेसुध्दा गळायला लागली. नर्सरीत लावलेली जंभेरीची रोपटेसुध्दा सुकायला लागली. विहिरीत पाणी आहे. परंतु वीज भारनियमनामुळे शेतकऱ्यांना ओलीत करता येत नाही. यामुळे अनेकवेळा वीज वितरण कंपनीकडे ेतक्रार करुनही दखल घेतली जात नाही. अभियंते म्हणतात, भारनियमनाचे अधिकार आमच्याकडे ेनाही. यामुळे शेतकऱ्यांनी जगावे की मरावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांवर आस्मानीसह सुलतानी संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये असंतोष उफाळला असून कोणत्याही क्षणी असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तालुक्यातील गाडेगाव, शेंदूरजनाघाट, पुसलासह आदी वीज कार्यालयांवर शेतकऱ्यांनी धडक देऊन तातडीने भारनियमन कमी करण्याची मागणी केली होती. परंतु अद्यापही भारनियमन कमी झालेले नाही. तालुक्यात कृषीपंपासाठी असलेला वीज पुरवठा वारंवार खंडीत असतो. भारनियमनसुध्दा वाढले असल्याने अनेकांना भारनियमनाचा फटका बसू लागला आहे.काही भागात विद्युत रोहित्रामध्ये बिघाड तर काही भागात वीजपुरवठा खंडित अशी अवस्था असल्याने कपाशी, मिरची, संत्राचे पिक बुडण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. विदर्भाचा कॅलिफार्निया म्हणून नावारुपास आलेल्या वरुड तालुक्यातील शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार, असे चित्र दिसू लागले आहे. एकीकडे निवडणूकीत कोरुटावधी रुपयाची उधळण तर दुसरीकडे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होण्याची चिंता आहे. यामुळे वीज वितरण कंपनीने तरी शेतकऱ्यावर सहानूभूती दाखवून वीज पुरवठा नियमीत करावा, अशी मागणी सर्वत्र केल्या जात आहे. वरुड तालुक्यात संत्रा, मिरची आणि कपाशी उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून डौलदार पिकांना ओलीत करण्याची गरज असताना वीज पुरवठ्या अभावी ओलिताचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगण्याची दाट शक्यता आहे. पुन्हा शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. भारनियमनामुळे तालुक्यातील लघुउद्योजकसुध्दा अडचणीत आले आहेत. बाजाराच्या दिवशी सायंकाळी विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांची चांगलीच परवड होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचाही खेळखंडोबा होत आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक भवित्याचा विचार करून राज्य विद्युत कंपनीने तालुक्यातील भारनियमन ताबडतोब कमी केले नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
भारनियमनामुळे रबी हंगामही धोक्यात
By admin | Updated: December 6, 2014 00:51 IST