अकाली पावसाचा रबीवर वार
By Admin | Updated: February 12, 2015 00:14 IST2015-02-12T00:14:27+5:302015-02-12T00:14:27+5:30
पावसाअभावी खरीप २०१४ चा हंगाम हातचा गेल्यानंतर शेतकऱ्यांची मदार रबी पिकावर आहे. परंतु मंगळवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास वादळवाऱ्यासह ....

अकाली पावसाचा रबीवर वार
लोकमत चमू अमरावती
पावसाअभावी खरीप २०१४ चा हंगाम हातचा गेल्यानंतर शेतकऱ्यांची मदार रबी पिकावर आहे. परंतु मंगळवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास वादळवाऱ्यासह अचानक तासभर कोसळलेल्या पावसाने ओंबीवर आलेला गहू जमिनदोस्त झाला. वरुड तालुक्यात आंबिया बहाराची फळे झडून पडली. पपईची पान फाटली तर आंब्याचा मोहोर २५ टक्के गळून पडला. पावसामुळे शेतातील तुरीची मोठी हानी झाली. वादळी पावसाने रात्रीपासून ठिकठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला होता. प्रकटदिनासाठी ठिकठिकाणी करण्यात आलेले मंडप वाऱ्यामुळे उडून गेले व भक्तांची तारांबळ उडाली.
मंगळवारी रात्री २ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात सर्वत्र वादळ वाऱ्यासह तासभर पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक नुकसान ओंबीवर आल्याचे गव्हाचे झाले. पावसामुळे गव्हाचा दाणा बारिक होणार आहे. पावसामुळे पहिल्या टप्प्यामधील गव्हाचे नुकसान झाले असले तरी दुसऱ्या टप्प्यातील गहू अद्याप ओंबीवर आलेला नाही. या गव्हाला, हरभऱ्याला या पावसाचा फायदा होणार आहे. सध्या खरिपातील तुरीचे पीक कापणी व मळणीवर आले आहे. काहींच्या शेतात तुरीच्या गंज्या लावण्यात आल्या होत्या. या गंज्या ओल्या झाल्या आहेत. वादळामुळे संत्राच्या आंबिया बहाराची लहान फळे खाली पडली आहेत. यावेळी कलमी व गावरान आंबे मोहरुन आले होते. वादळामुळे काही प्रमाणात मोहोर गळून पडला. ढगाळ वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास हरभऱ्यावर किडीचा प्रादुर्भाव होवू शकतो. पावसामुळे लग्नाचे मंडप, प्रकटदिनासाठी तयार करण्यात आलेल्या मंडपांची दाणादाण उडाली. विटभट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याने कच्च्या विटा विरघळून गेले. ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला. झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
पहिल्या टप्प्यातील गहू झोपला
जिल्ह्यात रबी गव्हाचे ६१ हजार ८५३ हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात पेरणी झालेला गहू आता ओंबी व पोटऱ्यांवर आहे. हा गहू वादळ वाऱ्यामुळे झोपला.या गव्हाचा दाणा बारीक होणार असल्याने सरासरी उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे.
तुरीच्या गंजीचे नुकसान
खरिपाची तूर सध्या सोंगणी, मळणीवर आहे. काही शेतात तुरीची सोंगणी झाल्यावर मळणीसाठी ढीग लावण्यात आले होते. या गंज्या ओल्या झाल्या. शेतात ओल असल्याने काही शेतांत आणखी काही दिवस सोंगणी होऊ शकत नाही. तर काही शेतात मळणी झाल्यानंतर तुरीचे पोते देखील ओले झाले आहेत.
कापूस झाला ओला
सिंचनाची सोय असणाऱ्या शेतात अद्याप कापसाची वेचणी सुरू आहे. हा कापूस झाडावरच ओला झाला. तसेच बाजार समिती, पणन् व सीसीआयच्या खरेदी केंद्रावरील कापसाच्या गंज्या भिजल्या.
वीट कारखान्यांना फटका
बहुतेक मोठ्या गावात विटांचे लहान-मोठे कारखाने आहेत. येथील विटभट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याने भट्टीसाठी तयार करण्यात आलेल्या मातीच्या विटा पावसामुळे विरघळल्या. विटांच्या लावण्यात आलेल्या रांगा देखील कोसळून पडल्या आहेत.
विजेअभावी मन:स्ताप
रात्री १ वाजताच्या सुमारास वादळवारे व विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी विद्युत कंपनीव्दारा वीज पुरवठा बंद करण्यात आला. वादळामुळे काही ठिकाणी तांत्रिक अडचण निर्माण झाली. मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता झालेल्या विजेचा बुधवार दुपारपर्यंत पत्ता नव्हता.