करजगावात पावसाने रबीचे नुकसान
By Admin | Updated: March 15, 2015 00:36 IST2015-03-15T00:36:42+5:302015-03-15T00:36:42+5:30
निसर्गापुढे मनुष्य हतबल आहे. याचा अनुभव यावर्षी प्रकर्षाने येत आहे. बळीराजाचे उभे पीक हातून गेले. या नापिकीमुळे शेतकरी होरपळून निघाला आहे.

करजगावात पावसाने रबीचे नुकसान
प्रमोद राऊत करजगाव
निसर्गापुढे मनुष्य हतबल आहे. याचा अनुभव यावर्षी प्रकर्षाने येत आहे. बळीराजाचे उभे पीक हातून गेले. या नापिकीमुळे शेतकरी होरपळून निघाला आहे.
चांदूरबाजार तालुक्यात कापूस हे मुख्य पीक. परंतु गंभीर रोगाने त्याचा नायनाट केला. पर्यायाने कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. यामुळे बळीराजा कमालीचा हवालदिल झाला. कापसाच्या हंगामावर शेतमजुरी अवलंबून असते. प्रामुख्याने कापूस वेचण्याची कामे मजुरांकडून करवून घेतली जातात. पण कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने मजुरांना मजुरी मिळणे अशक्य झाले आहे. यावरून या परिसरातील नापिकीची दाहकता लक्षात येते. घरात धान्य नाही, शेतात काम नाही. यामुळे शेतमजुराची अवस्था बिकट झाली आहे. शेतीच्या हंगामात जमा केलेले धान्य मजुरी नसल्यामुळे खाण्यात आले. पण भविष्यात कसे जगणार या विचारचक्रात तो गुंतला आहे. रोजगाराच्या कामाला सुरूवात झाली असली तरी तो गावापासून दूर जाण्यास तयार नाही. गावात काम नाही, घरात धान्य नाही. यामुळे ग्रामीण भागात वस्तू गहाण ठेवण्याचे प्रकार सुरू केल्याने त्यांचे घरातील चुली किती दिवस पेटणार, हाच खरा प्रश्न आहे. यंदा खरीप हंगामातही पाहीजे त्या प्रमाणात उत्पन्न झाले नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आता रबी हंगामावरही निसर्ग कोपल्याने वाईट अवस्था आहे.
बाजारपेठेत मंदी
कापूस व संत्रा नसल्याने बाजारपेठेत मंदीचे सावट आले आहे. मालाला उठाव नसल्याने व्यापारी वर्गसुद्धा नापिकीच्या फटक्याने गारद झाला आहे. परिसरातील गरीब शेतमजुरांची मुले अक्षरश: घरदार सोडून कामाच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. पण तेथेही त्यांना काम मिळत नसल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. जेथे व्यापाऱ्यांची दैनावस्था झाली तेथे त्यांना रोजगार कोण देणार, हा खरा प्रश्न आहे. शेतकरी यावर्षी नापिकीने पूर्णत: कर्जबाजारी झाला आहे. तो वर्षभर दुकानदाराकडून कपडे, किराणा, कृषीविषयक साहित्य उसनवारीने घेत असतो. त्याची परतफेड कशी करावी ही चिंता त्याला सदासर्वकाळ सतावत आहे. त्यामुळे अनेकांवर अल्पभावात जमिनी विकण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. मात्र विक्रीस काढलेल्या जमिनीला खरेदीदार मिळत नसल्याने चहूकडून बळीराजाची कोंडी होत आहे.
जनावरांची विक्री
यंदा शेती पिकली नसल्यामुळे वैरणाची समस्या निर्माण झाली. जंगलातही चाऱ्याची पाहिजे त्या प्रमाणात उगवन नसल्यामुळे पशुपालकांनी आपली जनावरे विक्रीला काढली आहे. नापिकीच्या फटक्याने ते आता कोठून जनावरांच्या वैरणाची सोय लावणार, कुटार, कडबा यांचे भाव आकाशाला भिडल्याने जनावरांचे पालन करणे कठीण झाले आहे.