नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदरापर्यटनस्थळावर शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांमध्ये जवळपास एक लाख पर्यटकांनी हजेरी लावली. रविवारी ऐतिहासिक अशी पर्यटकांनी गर्दी केली होती. तब्बल १० किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाचे नियोजन कोलमडले. अनेकांनी निराश मनाने परतीचा मार्ग धरला. परंतु, त्यांनाही ट्रॅफिक जाममध्ये अडकावे लागले. त्यातही काही हुल्लडबाज पर्यटक रस्त्यावर धिंगाणा घालताना दिसून आले.
चिखलदरा पर्यटनस्थळावर पावसाळ्याच्या दिवसँत लाखो पर्यटक पावसात भिजण्यासह निसर्गरम्य अशा वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येतात. सध्या पांढरेशुभ्र दाट धुके, विविध साहसी उपक्रम, डोळ्यांचे पारणे फेडणारा नजारा लाखो पर्यटकांना मनमोहित करणारा ठरला आहे. शनिवार, रविवार वीकएंडला हजारो पर्यटक येथे भेटी देतात. पाऊस कोसळताच मागील महिन्याभरात येथे दोन लाखांवर पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. १२ व १३ जुलै रोजी येथे राज्यभरासह नजिकच्या मध्यप्रदेशासुद्धा पर्यटक आलेत.
पोलिसांची दमछाकपोलिसांकडून अचूक बंदोबस्ताची गरज होती; परंतु शनिवारी रात्री १० पासून पर्यटकांच्या वाहनांच्या संगा परतवाडा, धामणगाव गडीमार्गे वळल्या. त्या रविचारी सायंकाळी पाचपर्यंत सुरूच होत्या; त्यामुळे पोलिसांना अंदाज आला नाही आणि पूर्णता नियोजन कोलमडले.
पर्यटक चारचाकीतून न उतरताच परतले
- रविवारी पर्यटनस्थळावर ऐतिहासिक अशी गर्दी झाली होती. तीन दिवसांत सात हजारांपेक्षा अधिक वाहनांची नोंद झाली. रविवारी ती सर्वाधिक होती. तब्बल १० किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
- पहाटे परतवाडा ते धामणगाव गडी येथील व्याघ्र प्रकल्पाच्या नाक्यापर्यंत, तर सायंकाळी पाचपर्यंत मोथा ते नगरपालिकेच्या नाक्यापर्यंत सहा किलोमीटर रांगा कायम होत्या. अनेक पर्यटक चारचाकीतून न उतरताच परतले. चार ते पाच तास रांगेत असलेल्या पर्यटकांना निघण्यासाठीही वाट काढावी लागली.
पालकमंत्र्यांनी दखल घ्यावीदऱ्याखोऱ्यांच्या मार्गावरून गर्दी झाल्यास दुर्घटनेची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यापूर्वीच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या गंभीर बाबीकडे तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.