'त्या' शासकीय कंपनीच्या कार्यालयातील जुगार कारवाईवर प्रश्नचिन्ह !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 19:39 IST2025-08-27T19:35:49+5:302025-08-27T19:39:28+5:30
Amravati : पोळ्याच्या रात्री जुगाराचा खेळ; पाचशेच्या नोटा, जप्ती ६,९०० चीच?

Question mark over gambling operation in 'that' government company's office!
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : पोळ्याच्या मध्यरात्री मोझरी येथील एका शासकीय कंपनीच्या कार्यालयात जुगार सुरू असल्याची माहिती खबऱ्यांकडून तिवसा पोलिसांना मिळाली. क्षणातच बीट जमादार चार कर्मचाऱ्यांसह जुगार अड्ड्यावर दाखल झाले. पोलिस दिसताच जुगाऱ्यांची त्रेधा उडाली. सर्व काही सोडून एकच पळापळ ज्यामध्ये झाली, एकजण नाहक गंभीर जखमी झाला तर अन्य एकाला गंभीर दुखापत झाली.
विश्वसनीय माहितीनुसार, पोलिस आले तेव्हा जुगाराचा डाव चांगलाच 'भारी' झाला होता. तो सोडून जुगारी पळाले. एवढेच नव्हेतर, घटनास्थळाची झाडाझडती घेतली असता. त्यातही लाखो रुपये सापडले असल्याची चर्चा आहे. या धावपळीत पोलिसांच्या हाती लागलेल्या चार-पाच जणांकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी खबऱ्याच्या माध्यमातून लाख रुपयांची मांडवली करण्यात आली. घटनेची नोंद घेताना मात्र चाणाक्ष बीट जमादाराने बनाव रचून काल्पनिक हकिकत दाखल केली, ज्यामध्ये जुगार हा सार्वजनिक रस्त्यावर खेळला जात होता, असे नमूद करण्यात आले. सर्वात आश्चर्यजनक म्हणजे, जुगारात ६,९०० सापडल्याचे दाखविण्यात आले. डझनभर जुगारी खेळत असताना दोघांवर गुन्हा दाखल करून अन्य अज्ञात आरोपी फरार दाखविण्यात आले. या जुगाराची उलटतपासणी व्हावी, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
नोटा ५०० च्या, जप्त ६,९०० रुपये कसे?
जुगारात पाचशेच्याच नोटा होत्या. शंभराच्या नोटांचा मुळी संबंध नव्हता, तर मग ६,९०० हा आकडा कोठून आला? धावपळीत पाचशेच्या नोटा खाली पडल्याने त्याची चिल्लर झाली असावी. पोळा हा सण बळीराजाचा, परंतु यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे अवसान गळाले. पण, या सणाने पोलिसांची ईडा-पीडा मात्र दूर केल्याची चर्चा आहे.
मुद्देमालात मोबाइलचा समावेश नाही
पोलिसांनी घटनास्थळावरून चार मोबाइल हस्तगत केले. परंतु, फिर्याद नोंदविताना जप्त मुद्देमालात समावेश का करण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
"बीट अंमलदाराने कारवाई केली. त्यांना घटनास्थळी जे साहित्य व आरोपी मिळाले, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. जुगाराबाबत होत असलेल्या चर्चेसंदर्भात व घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल."
- गोपाल उपाध्याय, ठाणेदार, तिवसा.