पेढी प्रकल्पग्रस्तांच्या मूल्यांकनाचा प्रश्न निकाली
By Admin | Updated: October 24, 2015 00:16 IST2015-10-24T00:16:21+5:302015-10-24T00:16:21+5:30
भातकुली तालुक्यातील पेढी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या अळणगाव येथील ५६१ कुटुंबांच्या घरांच्या मोबदल्याचा प्रश्न वर्षअखेरीस निकाली निघणार आहे.

पेढी प्रकल्पग्रस्तांच्या मूल्यांकनाचा प्रश्न निकाली
वर्षअखेरीस मोबदला : दीडचा गुणक, २०१३ च्या कायद्याचे निकष
अमरावती : भातकुली तालुक्यातील पेढी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या अळणगाव येथील ५६१ कुटुंबांच्या घरांच्या मोबदल्याचा प्रश्न वर्षअखेरीस निकाली निघणार आहे. दिवाळीनंतर या कुटुंबांना त्यांच्या घरांच्या मोबदल्याची रक्कम मिळणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून अळणगाव ग्रामस्थांनी पुनर्वसन आणि मूल्यांकनासाठी पाठपुरावा सुरू केला होता. प्रशासनानेही यात सकारात्मक भूमिका घेतल्याने २०१३ च्या पुनर्वसन कायद्याप्रमाणे अळणगाव येथील पेढी प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या घराचा मोबदला मिळणार आहे. निंभानजीकच्या पेढी नदीवर निम्नपेढी सिंचन प्रकल्प असून यात ५ गावे पूर्णत: बुडीत तर २ गावे अंशत: बुडीत आहे. अळणगाव, कुंडखुर्द, कुंड सर्जापूर, हातुर्णा आणि गोपगव्हाण या ५ गावातील घरांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यातील अळणगाव येथील कुटुंबांना कठोरा शेतशिवारामध्ये भूखंडसुद्धा मिळाले आहेत. भूखंड मिळाल्यानंतर घरांचा मोबदला देण्यात यावा, अशी आग्रही मागणी प्रकल्पग्रस्तांकडून होत होती.
निवाड्याचा प्रस्ताव नगररचना विभागाकडे
अळणगाव येथील ५६१ कुटुंबांच्या घरांचा प्रथम मूल्यांकन अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाकडून करण्यात आले. त्यानंतर मुल्यदर काढण्यासाठी हा प्रस्ताव नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. जमिनीच्या मूल्य दरात बांधकाम मूल्य समाविष्ट करून अंतिम किंमत काढण्यात येईल. अंतिम मूल्यनिर्धारण झाल्यानंतर तो निवाडा पुन्हा भूसंपादन अधिकारी २ कडे आल्यानंतर महसूल प्रशासनाकडून मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला जाईल व त्यावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर बुडीत क्षेत्रातील अळणगाव येथील ५६१ कुटुंबांना त्यांच्या घरासह खाली भूखंडाचा मोबदला देण्यात येईल. ही रक्कम ८ अ नमुनाधारकाच्या खात्यात थेट जमा करण्यात येईल.
१२/२ ची नोटीस
विभागीय आयुक्तालयाकडून प्रक्रियेला हिरवी झेंडी मिळाल्यानंतर अळणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना १२/२ ची नोटीस देण्यात येईल. त्यात मालमत्ता क्रमांक देण्यात येणाऱ्या रक्कमेचा अंतर्भाव असेल. आवश्यक दस्ताऐवज घेवून कुठे उपस्थित राहावे, हेसुद्धा या नोटीसमध्ये असेल.
प्रकल्प बांधकाम विभागाने बांधकाम मूल्य काढल्यानंतर मूल्यदर निश्चित करण्यासाठी प्रारूप निवाडा सहायक संचालक नगररचना विभागाकडे पाठविण्यात आला आहे. २५ सप्टेंबर २०१३ ला अळणगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये कलम-४ प्रसिद्ध करण्यात आली. त्यापूर्वीच्या ८ अ अर्थात घरमालकाच्या नावावर घराची मोबदल्याची रक्कम वळविली जाणार आहे.
१०० टक्के दिलासा रक्कम
अळणगाव येथील ५६१ कुटुंबांना त्यांच्या घर आणि जागेचा मोबदला २०१३ च्या पुनर्वसन कायद्यानुसार मिळणार आहे. यात मुळ मुल्यांकनासह दीडच्या गुणकाने मोबदला दिला जाईल. त्या रकमेवर १०० टक्के दिलासा रक्कम आणि कलम ४ ते अंतिम निवाड्यादरम्यानच्या कालावधीचे व्याज अंतर्भूत आहे. एखाद्या प्रकल्पग्रस्ताच्या घराचे मुळ मुल्यांकन १ लाख असेल तर त्याचा दीडपट गुणक अर्थात १ लाख अधिक दीड लाख म्हणजेच अडीच लाख, १०० टक्के दिलासा रक्कम म्हणजे अडीच लाख म्हणजेच एकूण ५ लाख व अधिक १२ टक्के व्याजाची रक्कम प्रकल्पग्रस्तांना दिली जाणार आहे.
कलम ४ नुसारचा निकष
अळणगाव येथे २५ सप्टेंबर २०१३ ला कलम ४ प्रसिद्ध झाली. त्यापूर्वीच्या ‘८-अ’ अर्थात घरधारकास घराच्या मोबदल्याची रक्कम मिळेल. हा मोबदला वर्षअखेरीस दिला जाणार आहे. सुमारे ३० कोटी रूपयांचे हे वितरण आहे.
अळणगाव येथील पेढी प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या मोबदल्याचा प्रस्ताव नगररचना विभागाकडे पाठविण्यात आला आहे. दीड पटीचा गुणक, १०० टक्के दिलासा रक्कम आणि कलम ४ नंतरच्या कालावधीतील व्याजाची रक्कम प्रकल्पग्रस्तांना २०१५ च्या अखेरपर्यंत मिळेल.
- जयंत देशपांडे,
उपजिल्हाधिकारी, भूसंपादन.