शाळा, वसतिगृहांना ‘क्वारंटाईनमुक्त’चे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:01 IST2020-08-19T05:00:00+5:302020-08-19T05:01:00+5:30
‘लॉकडाऊन’च्या काळात शाळा, महाविद्यालये बंद करण्याचे निर्देश होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन सेंटरसाठी शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे ताब्यात घेतली होती. यात आदिवासी विकास विभाग, जिल्हा परिषद, महापालिका व सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचा समावेश होता. हल्ली कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असली तरी हळूहळू क्वारंटाईन सेंटर कमी करण्यात येत आहे.

शाळा, वसतिगृहांना ‘क्वारंटाईनमुक्त’चे वेध
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संसर्गावर उपाययोजना म्हणून शासनाने शाळा, वसतिगृहे ‘क्वारंटाईन’साठी ताब्यात घेतल्या होत्या. एप्रिलपासून गाव, खेड्यातील शाळांमध्ये कोरोना संक्रमित आणि संशयित रुग्णांना ठेवण्यात आले. मात्र, आता शाळा, वसतिगृहे सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्यांना ‘क्वारंटाईनमुक्त’चे वेध लागले आहेत.
‘लॉकडाऊन’च्या काळात शाळा, महाविद्यालये बंद करण्याचे निर्देश होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन सेंटरसाठी शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे ताब्यात घेतली होती. यात आदिवासी विकास विभाग, जिल्हा परिषद, महापालिका व सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचा समावेश होता. हल्ली कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असली तरी हळूहळू क्वारंटाईन सेंटर कमी करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एकूणच शाळा परत घेतल्यानंतर त्या पूर्णपणे सॅनिटाईझ केल्या आहेत. भविष्यात या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार असल्याने शाळा सुरक्षित करण्यात आल्या आहेत. मात्र, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या २४ वसतिगृहांचा ताबा अद्यापही जिल्हा प्रशासनाने दिलेला नाही, अशी माहिती उपायुक्त विजय सावळे यांनी दिली. आदिवासी विकास विभागाची पाच वसतिगृहे, तीन आश्रमशाळा अद्यापही क्वारंटाइन सेंटरसाठी ताबा कायम असल्याची माहिती ‘ट्रायबल’चे उपायुक्त नितीन तायडे यांनी दिली. सुरुवातीला महापालिकेच्या चार शाळा क्वारंटाईन सेंटरसाठी ताबा देण्यात आल्या होत्या. त्या परत मिळाल्या आहेत. एकूणच शाळांचे सॅनिटायझेशन करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी अब्दुल राजीक यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन सेंटरसाठी प्रारंभी ९७० शाळा घेतल्या होत्या. आता संपूर्ण शाळांचा ताबा मिळाला आहे. सर्व शाळा सॅनिटाईझ करण्यात आल्या आहेत. शासनाचे शाळा सुरु करण्याचे आदेश येताच त्या सज्ज करून ठेवण्यात आल्या आहेत.
- प्रिया देशमुख
शिक्षणाधिकारी, अमरावती.