पूर्णा धरणाची पातळी घसरली

By Admin | Updated: July 12, 2014 00:35 IST2014-07-12T00:35:41+5:302014-07-12T00:35:41+5:30

पावसाळा सुरू होऊन ३२ दिवस झाले. एरवी मृगात पेरणी होणे शेतकऱ्यांना अपेक्षित असते. यंदा मृगाच्या ‘हत्ती’ने तर शेतकऱ्यांना दगा दिलाच; मात्र आर्द्राच्या ‘मोरा’नेही तारले नाही.

Purna dam level has dropped | पूर्णा धरणाची पातळी घसरली

पूर्णा धरणाची पातळी घसरली

सुरेश सवळे चांदूरबाजार
पावसाळा सुरू होऊन ३२ दिवस झाले. एरवी मृगात पेरणी होणे शेतकऱ्यांना अपेक्षित असते. यंदा मृगाच्या ‘हत्ती’ने तर शेतकऱ्यांना दगा दिलाच; मात्र आर्द्राच्या ‘मोरा’नेही तारले नाही. म्हणून प्रतीक्षा करून थकलेल्या शेतकऱ्यांनी नाईलाजाने पुनर्वसूच्या ‘गाढव’वर विश्वास ठेवून घाईगर्दीने खरेदी केलेल्या बियाण्यांची पेरणी सुरू केली आहे. मागील वर्षी या काळात पूर्णा धरणात अतिरिक्त पावसाचे पाणी पाठवल्यामुळे दोनदा धरणाची दारे उघडावी लागली होती. मात्र यंदा अतिरिक्त साठा तर सोडाच; आहे त्या पातळीतही एक मिटरने झालेली घट भविष्यातील पाणी टंचाईची जाणीव करून देण्यास पुरेशी आहे.
मृगात पेरणी करण्यासाठी किमान १०० मि.मी. पावसाची गरज असताना ती अपेक्षा मृगाने पूर्ण केली नाही. परिणामी मृगात पेरल्या जाणारे मूग, उडीद या सारख्या पिकांना पेरणीतून हद्दपार व्हावे लागले. सोयाबीन पिकालाही मृग किंवा आर्द्राच्या पावसाची गरज असते. या पिकाची पेरणी जास्तीत जास्त १५ जुलैपर्यंत व्हावी, तेव्हाच अपेक्षेप्रमाणे उत्पादन होण्याची शक्यता असते. त्याच आशेवर आता शेतकऱ्यांनी आपल्याकडील उपलब्ध सोयाबीन बियाण्यांच्या पेरणीला सुरूवात केली आहे. यंदा जिल्ह्यात ४ लाख ७९ हजार ८८० पीक पेरणीचे लक्ष प्रशासनाचे होते. मात्र पेरणीला आवश्यक पाऊस न झाल्यामुळे १ जूनपासून जिल्ह्यात केवळ ८०.०३ मि.मी. पावसाची नोंद झाली. सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद, ज्वारीसह अन्य तेलबिया ही खरिपातील नगदी पिके आहेत. यंदा जिल्ह्यात पडलेला पाऊस सार्वत्रिक नसल्यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी दैव व नशिबावर विश्वास टाकून १० हजार हेक्टरवर सोयाबीन, २ हजार ३१२ हेक्टर कापूस, २ हजार ९४० हेक्टर तूर व केवळ २४० हेक्टर जमिनीत मुगाची पेरणी केली. जिल्ह्यात एकूण ३३ हजार ८७७ हेक्टरवर पेरणी करण्याचे धाडस आजपर्यंत शेतकऱ्यांनी दाखविले आहे. मात्र पुनर्वसूतील पावसाने नियमित हजेरी लावली नाही तर शेतकरी अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण नगण्य असल्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या गर्तेत आहे. दुष्काळग्रस्त स्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडे अद्याप तरी कोणत्याच उपाययोजना नसल्याने शेतकरी आत्महत्येच्या दारात उभा आहे. काही शेतकऱ्यांना पेरणी न करताच कर्ज भरण्याचा तगादा लावल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा स्थितीवर नियंत्रण आणण्याकरिता प्रशासनाकडे यावर योजना अद्याप तरी नसल्याचे वास्तव आहे.

Web Title: Purna dam level has dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.