तेरवीच्या खर्चाची रक्कम डफरीनच्या साहित्य खरेदीसाठी
By Admin | Updated: October 25, 2015 00:07 IST2015-10-25T00:07:13+5:302015-10-25T00:07:13+5:30
पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी अंबादासपंत भं. उभाड यांचे निधन झाले.

तेरवीच्या खर्चाची रक्कम डफरीनच्या साहित्य खरेदीसाठी
संवेदनशील उपक्रम : उभाड परिवाराची मदत
अमरावती : पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी अंबादासपंत भं. उभाड यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या तेरवीच्या कार्यक्रमावर खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपून त्यांचे पुत्र पंकज व अभिजित उभाड यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाला मदत करण्याचे ठरविले.
उभाड परिवाराने त्यांचे वडील स्व. अंबादासपंत उभाड यांची तेरवी न करण्याचा निर्णय घेऊन विजयादशमीच्या दिवशी जुन्या परंपरेचा सीमोलोंघन करून नवीन परंपरेला चालना दिली. त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात ३० लोखंडी पलंग, २ वॉटर कुलर स्मृती म्हणून भेट दिली.
या हृदयस्पर्शी व सर्वांना प्रेरणा देणाऱ्या समारंभाला जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. बच्चू कडू, माजी आमदार संजय बंड, प्रयास संस्थेचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, डॉ. यादव, डॉ. भालेराव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, अजय पाटील टवलारकर, वामनराव उभाड आदी प्रमुख मंडळी उपस्थित होती.
मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री पोटे म्हणाले, हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून तेरवी रद्द करून समाजेपयोगी उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. उभाड कुटुंबांनी शासकीय रुग्णालयास भेटवस्तू अर्पण करून एक चांगला आदर्श निर्माण केला. या उपक्रमाची देशपातळीवर नोंद व्हायला पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी माजी आ. संजय बंड, आ. बच्चू कडू, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)