राष्ट्रसंतांची पुण्यतिथी; श्रद्धांजली सोहळ्यात दोन लाख गुरुदेवभक्तांचा ऑनलाईन सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 05:00 IST2020-11-09T05:00:00+5:302020-11-09T05:00:02+5:30
दरवर्षी याच कार्यक्रमाला ८ ते १० लाख गुरुदेवभक्तांची उपस्थिती असते. यंदा मात्र कोरोनामुळे सामूहिक सहभागास जिल्हा प्रशासनाने मज्जाव केला होता.

राष्ट्रसंतांची पुण्यतिथी; श्रद्धांजली सोहळ्यात दोन लाख गुरुदेवभक्तांचा ऑनलाईन सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे उपस्थित राहू न शकणाऱ्या गुरुदेवभक्तांना समाज माध्यमांसह अन्य प्रकारात ऑनलाईन सहभागी होण्याची पर्वणी साधता आली. या माध्यमांद्वारे दोन लाखांवर गुरुदेवभक्तांनी ऑनलाईन उपस्थिती नोंदवीत गुरुमाउलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
खंजिरी भजनांच्या माध्यमातून राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे, विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे विज्ञानवादी युगपुरुष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथी सोहळ्यात ५ नोव्हेंबरला मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम गुरुदेवभक्तांसाठी महत्त्त्वपूर्ण होता. दरवर्षी याच कार्यक्रमाला ८ ते १० लाख गुरुदेवभक्तांची उपस्थिती असते. यंदा मात्र कोरोनामुळे सामूहिक सहभागास जिल्हा प्रशासनाने मज्जाव केला होता. त्यामुळे अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे अध्यात्म विभागप्रमुख राजाभाऊ बोथे यांनी पुण्यतिथी सोहळा ऑनलाईन करण्यासाठी व गुरुकुंजातील सोहळ्याप्रमाणे घरीच मौन श्रद्धांजली अर्पण करता यावी, यासाठी फेसबूक लाईव्ह व अन्य एक यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था केली होती. याद्वारे तब्बल दोन लाख गुरुदेवभक्तांनी हा सोहळा ह्ययाचि देही, याचि डोळाह्ण पाहिल्याचा अनुभव घेतला व राष्ट्रसंतांना आपल्या कुटुंबीयांसह साश्रू नयनांनी आदरांजली वाहिली.
गावागावात स्क्रीनवर दाखविला सोहळा
फेसबूक पेजच्या माध्यमातून एक लाख लोकांपर्यंत श्रद्धांजली सोहळा पोहोचला. ३८२ नागरिकांनी तो शेअर केला. सामुदायिक ध्यान सोहळा ३ लाख ७५ हजार ९६४ नागरिकांनी पाहिला. कीर्तनदेखील दीड लाखांवर नागरिकांनी पाहिले. राष्ट्रसंंतांना गावागावांत मोठ्या स्क्रीनद्वारे मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
१३ लाख ८ हजार मिनिटे जुळले गुरुदेवभक्त
यूट्यूब चॅनलसह श्रीगुरुदेव मौन श्रद्धांजली या नावाने फेसबूकवर पुण्यतिथी सोहळा ऑनलाईन दाखविण्यात आला. १ लाख ७७ हजार २१२ सदस्यांनी मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग घेतला. १३ लाख ७ हजार ४६६ मिनिटे या चॅनलचे अवलोकन झाले. ६,३२६ सदस्यांनी कायमस्वरूपी नोंदणी केली. १३,०७४ सदस्य फेसबूक पेजला जुळले, असे राजाभाऊ बोथे म्हणाले.
कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत दोन लाखांवर गुरुदेवभक्तांनी ऑनलाईन सहभागी होत राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण केली. सर्वांच्या सहभागासाठी यूटूब चॅनल व फेसबूक लाईव्हद्वारे व्यवस्था करण्यात आली होती.
- राजाभाऊ बोथे, अध्यात्म विभागप्रमुख, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ