पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशन मोड’वर पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:13 AM2021-07-25T04:13:15+5:302021-07-25T04:13:15+5:30

अमरावती : अतिवृष्टीने बाधित गावांमध्ये पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशन मोड’वर पूर्ण करावी. आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना ...

Punchnama, complete the survey process in 'Mission Mode' | पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशन मोड’वर पूर्ण करा

पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशन मोड’वर पूर्ण करा

Next

अमरावती : अतिवृष्टीने बाधित गावांमध्ये पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशन मोड’वर पूर्ण करावी. आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना परिपूर्ण भरपाई मिळावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून व दु:ख जाणून संवेदनशीलतेने ही प्रक्रिया पार पाडावी. एकही नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित राहता कामा नये, असे सुस्पष्ट निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिले.

ना. ठाकूर यांनी गत दोन दिवसांत पुसदा, शिराळा, खारतळेगाव, रामा, साऊर, टाकरखेडा संभू, देवरा, देवरी, ब्राम्हणवाडा आदी अतिवृष्टिग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली व ग्रामीण नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर याबाबतची कार्यवाही व प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस आयुक्त आरती सिंह, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की, अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह विविध उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, अतिवृष्टीने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी शेतीच्या नुकसानाचे पंचनामे तत्काळ पूर्ण करावेत. काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्याच्या अचूक नोंदी अहवालाद्वारे घ्याव्यात. यासाठी तालुका कार्यालयांनी वेळोवेळी अपडेट माहिती दिली पाहिजे. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना भरपाई मिळण्यासाठी परिपूर्ण अहवाल द्यावे. मेळघाटातही पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया गतीने राबवावी. नागरिकांना आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

------------------

पुसदा येथील पुलाची उंची वाढवा

पूर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहे. त्यासाठी बांध, नाला खोलीकरण आदी कामे पूर्ण करावीत. पुसदा, शिराळा येथे पूर नियंत्रणासाठी नाल्याचे, पुलाचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. अतिवृष्टीने आलेल्या महापुराने अमरावती-चांदूर बाजार रस्त्यावरील पुसदा गावालगतचा पूल जाम होऊन वाहतूक खोळंबली. शेतीचेही नुकसान झाले. त्यामुळे तेथील पुलाची उंची व रुंदी वाढविण्यासाठी काम राबविण्यात यावे. हे काम गतीने पूर्ण झाले पाहिजे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी मुख्य सार्वजनिक बांधकाम अभियंता अरुंधती शर्मा यांना दिले.

-------------------

प्राथमिक निष्कर्षानुसार ५०० गावे, २३ हजार हेक्टर शेती बाधित

पंचनामा प्रक्रिया व प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यात ५०० गावे बाधित असून, सुमारे २३ हजार ५५५ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. शेतजमीन खरडून झालेले नुकसानाचे क्षेत्र ८८१ हेक्टर आहे. १४२ गावांत पंचनामे पूर्ण झाले असून, २५८ गावांत सुरू आहेत.

अमरावती तालुक्यात १४ गावे व ५०० हेक्टर शेती, भातकुली तालुक्यात १३७ गावे व ६ हजार २२ हेक्टर शेती बाधित आहे. भातकुली तालुक्यात शेतजमीन खरडून नुकसानाचे क्षेत्र ६६९ हेक्टर व चांदूर रेल्वे तालुक्यात २७ गावे बाधित व ११९.९२ हेक्टर शेतजमीन खरडून नुकसान झाले आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शेतजमीन खरडून नुकसानाचे क्षेत्र १५.७९ हेक्टर व बाधित गावांची संख्या पाच आहे. मोर्शी तालुक्यात २ गावे १३९.६ हेक्टर शेती बाधित आहे.

-------------

दर्यापूर तालुक्यात मोठे नुकसान

दर्यापूर तालुक्यात १५४ गावे व १२ हजार ८४४ हेक्टर शेती बाधित आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात ४५ गावे व ३९३ हेक्टर शेती बाधित आहे. चिखलदरा तालुक्यात ७३ गावे व एक हजार १०८ हेक्टर शेती बाधित आहे. चांदूर बाजार तालुक्यात ४३ गावे व २ हजार ५४९ हेक्टर शेती बाधित आहे.

जिल्ह्यातील वलगाव, भातकुली, आसरा, खोलापूर, चांदुर, घुईखेड, सातेफळ, पुसला,बेनोडा, दर्यापूर, दारापूर, खल्लार, थिलोरी, येवदा, अंजनगाव, सातेगाव, कोकर्डा, चांदूर, तळेगाव दशासर, सावलीखेडा, धारणी, हरिसाल, धुळघाट, सादराबाडी या मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा जादा पाऊस झाला.

-----------------------

जीवितहानी झालेल्या कुटुंबांना मदत मिळवून द्या

नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित हानी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना तत्काळ मदत मिळवून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. वीज कोसळून धामणगाव रेल्वे तालुक्यात दोन, अमरावती व धारणी तालुक्यात प्रत्येकी एक, पुरात वाहून भातकुली तालुक्यात गेल्याने दोन, अंजनगाव सुर्जी तालुक्यात एक, दर्यापूर तालुक्यात चक्रीवादळाने भिंत कोसळून एक अशी जीवितहानी झाली. अचलपूर तालुक्यात १ व्यक्ती वीज पडून जखमी झाली.

पावसामुळे शेतीत चिखल असल्याने पोहोचण्यास अडथळे येतात. असे असले तरी शक्य तिथे पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे निर्देश देण्यात आले.उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, नितीनकुमार हिंगोले, रणजित भोसले, मनोज लोणारकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, तहसीलदार संतोष काकडे, नीता लबडे, योगेश देशमुख, जगताप आदी उपस्थित होते.

Web Title: Punchnama, complete the survey process in 'Mission Mode'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.