CAA आणि NRC विरोधात जनआक्रोश, बडनेऱ्यात रेल रोको आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 21:13 IST2019-12-21T21:13:08+5:302019-12-21T21:13:24+5:30
बडनेऱ्यातील विविध समुदायाच्या नागरिकांनी शनिवारी रेल्वे स्थानकावर शेकडोच्या संख्येत पोहोचून रेल्वे रूळावर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात नारेबाजी केली.

CAA आणि NRC विरोधात जनआक्रोश, बडनेऱ्यात रेल रोको आंदोलन
अमरावती - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात शनिवारी शेकडोच्या संख्येत नागरिकांनी गीतांजली एक्स्प्रेससमोर निदर्शने करून रेल रोको आंदोलन केले.
बडनेऱ्यातील विविध समुदायाच्या नागरिकांनी शनिवारी रेल्वे स्थानकावर शेकडोच्या संख्येत पोहोचून रेल्वे रूळावर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात नारेबाजी केली. यादरम्यान गीतांजली एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर पोहोचल्यानंतर आंदोलनकर्ते रेल्वेपुढे जाऊन थांबले. गीतांजली एक्स्प्रेस तीन मिनिटे बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबते. आपला जनआक्रोश शासनापर्यंत शांततेच्या वातावरणात पोहोचावा, या उद्देशाने हे आंदोलन करण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनातील १४ जणांवर भादंविचे कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. आंदोलनस्थळी शहर पोलीस, रेल्वे पोलिसांचा मोठा ताफा तैनात होता. उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी, रेल्वेचे सहायक पोलीस निरीक्षक एस. डी. वानखडे, रेल्वे सुरक्षा बलाचे बी. एस. नरवार हे उपस्थित होते.