अनुदानाअभावी उसनवारीवर चालताहेत सार्वजनिक ग्रंथालये
By Admin | Updated: July 28, 2015 00:27 IST2015-07-28T00:27:08+5:302015-07-28T00:27:08+5:30
ग्रंथालय संचालनालयाकडून मार्च महिन्यातील अनुदान न मिळाल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचा कारभार उधार उसनवारीवर सुरू आहे.

अनुदानाअभावी उसनवारीवर चालताहेत सार्वजनिक ग्रंथालये
वेतनही रखडले : मार्च महिन्यापासून अनुदान प्रलंबित
अमरावती : ग्रंथालय संचालनालयाकडून मार्च महिन्यातील अनुदान न मिळाल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचा कारभार उधार उसनवारीवर सुरू आहे. ग्रंथालय चालकांचे सहा महिन्यांपासून वेतनही थकीत आहेत.
शासन मान्यताप्राप्त सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथालय संचालनालयाकडून वार्षिक अनुदान सहा महिन्याच्या अंतरात दोनवेळा प्राप्त होते. ग्रंथालयाच्या वर्गवारीनुसार अनुदान मिळत असते. मात्र जिल्ह्यातील ग्रंथालयांना अद्याप मार्च महिन्यात मिळणारे पहिल्या टप्प्यातील अनुदान मिळाले नाही. यामुळे ग्रंथालयाची परवड होत आहे. ग्रंथालयाचे सहा महिन्याचे वेतन थकीत असून दैनंदिन खर्च नियतकालीकांचा खर्च यासाठी ग्रंथालय चालकांनाही उसनवारी कामे भागवावी लागत आहेत.
ग्रंथालय चालवणे झाले अवघड
ग्रंथालय संचालकांकडून अबकड असे तालुका आणि जिल्हा या वर्गवारीनुसार सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान देण्यात येते.
ड वर्गातील ग्रंथालयांना सर्वात कमी वार्षिक ५२ हजार रुपये अनुदान मिळते. या अनुदानातून शासन नियमानुसार ५० टक्के खर्च कर्मचाऱ्यांचे वेतन, ३० टक्के पुस्तकांची खरेदी व उर्वरित खर्च करावयाचा असतो. एवढ्या कमी अनुदानात ग्रंथालय चालवण्याची ग्रंथालय चालकांची कसरत सुरू आहे. त्यातच वेळेवर अनुदान मिळत नसल्याने परिस्थिती बिकट बनली आहे. (प्रतिनिधी)
सार्वजनिक ग्रंथालयांना मार्च महिन्यात मिळणारे पहिल्या टप्प्यातील अनुदान अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे ग्रंथालयांचा कारभार उधार उसनवारीवर सुरू आहे. ग्रंथालयांचे सहा महिन्यांपासून वेतन थकीत आहेत. त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे.
- अशोक रोडे,
ग्रंथालय संचालक.