ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, स्वच्छतेसाठी तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:13 IST2021-03-17T04:13:57+5:302021-03-17T04:13:57+5:30
नांदगाव खंडेश्वर : केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व स्वच्छतेकरिता भरीव तरतूद करण्यात आली आहे. सन ...

ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, स्वच्छतेसाठी तरतूद
नांदगाव खंडेश्वर : केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व स्वच्छतेकरिता भरीव तरतूद करण्यात आली आहे.
सन २०२०/२१ ते २०२४/२५ या कालावधीकरिता पंधराव्या वित्त आयोगाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत दहा टक्के निधी जिल्हा परिषद स्तरावर, दहा टक्के निधी पंचायत समिती स्तरावर, ८० टक्के निधी ग्रामपंचायत स्तरावर प्राप्त होत आहे. या योजनेत ग्रामपंचायत स्तरावर कामे करताना ५० टक्के बंधित स्वरूपात निधी असून, त्यापैकी २५ टक्के निधी हा स्वच्छता व हगणदारीमुक्त गावाचा दर्जा कायम राखण्यासाठी तसेच २५ टक्के निधी पाणीपुरवठा व जलपुनर्भरण, पावसाच्या पाण्याची साठवण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, जलपुनर्भरण प्रक्रिया या कामांसाठी दिला जाणार आहे. ५० टक्के अबंधित निधी हा मानव विकास निर्देशांक, महिला व बाल कल्याण मागासवर्गीयांवर लोकसंख्येच्या प्रमाणात व उर्वरित निधी इतर कामावर खर्च करण्याबाबत यापूर्वी तरतूद होती. यात आता बदल होऊन शासन परिपत्रकानुसार आता बंधित निधी ६० टक्के करण्यात आला असून, त्यापैकी ३० टक्के निधी स्वच्छता व ३० टक्के निधी पाणीपुरवठा या प्रकल्पाकडे वाढविण्यात आला आहे. अबंधित निधी ४० टक्के करण्यात आला आहे. बंधित निधीचे प्रमाण ६० टक्के करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना सक्षम होण्यास मदत होणार असून, जलपुनर्भरण, जल पुनर्प्रक्रिया ही कामे ग्रामीण भागात आता प्रभावी होण्यास मदत होणार आहे.