दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला सहआरोपी करण्याची तरतूद : प्रकाश दाभाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST2019-12-05T06:00:00+5:302019-12-05T06:00:50+5:30
महिलांच्या वैयक्तिक सुरक्षेकरिता विशेषाधिकार (स्पेशल राइट टू प्रायव्हेट डिफेन्स) ही कायद्यात तरतूद आहे. महिलांवरील अत्याचार प्रभावीरीत्या रोखण्यासाठी कायद्यात अपेक्षित संशोधनाचा मसुदा तज्ज्ञ प्राध्यापक, जाणकार नागरिक, समाजसेवक आणि विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी एकत्रितपणे केलेल्या मंथनातून तयार केला जाईल.

दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला सहआरोपी करण्याची तरतूद : प्रकाश दाभाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महिला अत्याचारप्रकरणी तक्रार नोंदविण्यात दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाºयाला सहआरोपी करा, असे विधान प्राध्यापक डॉ. प्रकाश दाभाडे यांनी केले. हैद्राबाद येथील महिला पशुवैद्यकाच्या बलात्कार व निर्घृण खून प्रकरणाचा निषेध येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात निषेध करण्यात आला. त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.
विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमादरम्यान प्रचार्य, प्राध्यापकवृंद आणि समस्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दिशाला मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महिलांच्या वैयक्तिक सुरक्षेकरिता विशेषाधिकार (स्पेशल राइट टू प्रायव्हेट डिफेन्स) ही कायद्यात तरतूद आहे. महिलांवरील अत्याचार प्रभावीरीत्या रोखण्यासाठी कायद्यात अपेक्षित संशोधनाचा मसुदा तज्ज्ञ प्राध्यापक, जाणकार नागरिक, समाजसेवक आणि विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी एकत्रितपणे केलेल्या मंथनातून तयार केला जाईल. विधी आयोगाला सदर मसुदा पाठविला जाईल, अशी प्रभावी संकल्पना यावेळी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रणय मालवीय यांनी मांडली. सर्वसामान्यांच्या नजरेतून कायद्यात अपेक्षित बदल करण्याचा या कल्पनेचे सर्वांनी स्वागत केले. अशा अन्यायाविरुद्ध लढण्याच्या, सतर्क राहण्याच्या त्यांच्या आवाहनाला तमाम उपस्थितांनी हात पुढे करून प्रतिसाद दिला.
घटना दु:खद आहे. आरोपींचे कृत्य निसर्गविरोधी आहे. त्यामुळे दोषसिद्धीनंतर आरोपींना फाशी होणे हाच एक पर्याय आहे.
ही कायद्यातील उपयोगिता अधोरेखित करतानाच ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवून घेण्यास दिरंगाई वा टाळाटाळ केली, त्या पोलीस अधिकाऱ्याला गुन्ह्यात सहआरोपी करण्याची तरतूद भारतीय कायद्यात आहे; तथापि माध्यमे, समाज आणि इतर संबंधित व्यवस्था या मुद्यावर ना भाष्य करत, ना पोलिसांना सहआरोपी करण्याचा आग्रह धरत. रात्री बेपत्ता झालेल्या दिशाला पोलिसांनी तात्काळ शोधले असते, तर आता कदाचित ती जिवंत असू शकली असती. अशा घटनेत दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना जोपर्यंत जागोजागी, गावोगावी सहआरोपी केले जात नाही, तोपर्यंत कायद्याचा वचक गुन्हेगारांवर निर्माण होणार नाही, असे प्रभावी मार्गदर्शन विधिज्ञ प्रकाश दाभाडे यांनी केले. शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यास आवश्यक कायद्यांचा प्रचार-प्रसार विधी महाविद्यालयातील विद्यार्थी करतील, अशी तयारीही त्यांनी या मंचावरून जाहीर केली.
प्राध्यापक भाग्यश्री देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. स्त्रिया या केवळ उपभोग्य वस्तू नसून, त्यांचा सन्मान जपण्याचे बाळकडू प्रत्येक आई-वडिलांनी मुलाला द्यायला हवे, असा मंत्र त्यांनी दिला. याप्रसंगी संजय भोगे, राजेश पाटील, नंदकिशोर रामटेके, चैतन्य घुगे आदी प्राध्यापकांसह महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. अथर्व पिंजरकर, मनोज पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. आरूषी ठाकूर, घुनेश चांडक, संदीप पारवे, मनोज नरवाडे, सुरेश शेषकर या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता.