धामणगावात विद्यार्थिनीच्या हत्येचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:29+5:30
६ जानेवारी रोजी प्रणिता या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. दुसºया दिवशी एका चिमुकलीवर नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना पुढे आली. त्यामुळे धामणगाव तालुक्यात विद्यार्थिनी, मुली सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून सर्वपक्षीय नेत्यांकडून सोमवारी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निषेध मोर्चा काढण्यात आला.

धामणगावात विद्यार्थिनीच्या हत्येचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : एकतर्फी प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीची हत्या व चिमुकलीवर अतिप्रसंग या दोन्ही घटनांतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी धामणगाव शहरातील सर्व विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर सोमवारी निषेध मोर्चा काढला. या मोर्चात सर्वच राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते.
धामणगाव शहरात ६ जानेवारी रोजी प्रणिता या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. दुसºया दिवशी एका चिमुकलीवर नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना पुढे आली. त्यामुळे धामणगाव तालुक्यात विद्यार्थिनी, मुली सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून सर्वपक्षीय नेत्यांकडून सोमवारी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शास्त्री चौक, टिळक चौक, मेन लाईन ,गांधी चौक, भगतसिंग चौक, कॉटन मार्केट चौक येथून तहसील कार्यालयावर पोहोचला. मोर्चात धामणगावातील सेफला हायस्कूल, हिराबाई गोयनका कन्या विद्यालय, हरिबाई प्राथमिक शाळा, आदर्श महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, मुकुंदराव पवार पब्लिक स्कूल, स्व. नंदलाल लोया कन्या विद्यालय, श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय, श्रीराम महिला महाविद्यालय, ओम इंग्लिश मीडियम स्कूल, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार जगदीश मंडपे यांना पाच शाळकरी विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. या मोर्चात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, प्रहार, स्वाभिमानी पक्ष, मनसे आदी पक्षांचे नेते, व्यापारी बांधव तसेच नागरिक सहभागी झाले. पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
बाजापेठ बंद
धामणगाव शहरातील दुकाने, बाजारपेठ सकाळपासूनच स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी या निषेध मोर्चाला समर्थन दिले. या मोर्चात प्रणिताचे कुटुंबीय सहभागी झाले होते.
टारगटांचे टोळके आवरा
आम्ही सर्वांच्या घरातील मुलींसारख्याच मुली आहोत. ग्रामीण भागातून एसटीने शहरात येतो. एसटीचे नियोजन नसते त्यावेळी आम्हाला बस स्थानकात अनेक तास बसावे लागते. आम्ही निवांत ठिकाणी अभ्यास करायला बसलो, तर काही गुंड प्रवृत्तीची मुले आम्हाला त्रास देतात. आमचा पाठलाग करतात, अशा प्रतिक्रिया इयत्ता नववी शिकणाºया ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी याप्रसंगी व्यक्त केल्या. पोलिसांनी आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये, असे म्हणत काही विद्यार्थिनींनी सरळ अश्रूला वाट मोकळी करून दिली.
रांगोळीऐवजी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घ्या
मुलींनी स्वयंपाक, रांगोळी यांचे प्रशिक्षण घेण्याऐवजी जुडो-कराटे चे प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी बनणे गरजेचे असल्याचे मत इयत्ता बारावी शिकणाºया विद्यार्थिनीने व्यक्त केले.
खून व अत्याचार
ही दोन्ही प्रकरणे निषेधार्ह असून, या दोन्ही प्रकरणांतील आरोपींना भररस्त्यात फाशी द्या, अशी उत्स्फूर्त मागणी समीक्षा बुटले हिने व्यक्त केली. आंचल घुगे, वृषाली राऊत या विद्यार्थिनींनी आपले मत व्यक्त केले.