बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांमुळे प्राचार्यांचा ताप वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:12 IST2021-04-22T04:12:48+5:302021-04-22T04:12:48+5:30

परीक्षा लांबल्या, साहित्य सांभाळून ठेवण्याचे शाळांना आदेश अमरावती : दरवर्षी बोर्ड विद्यार्थ्यांची परीक्षा घेते. पण, यंदा परीक्षेमुळे खुद्द बोर्डाचीच ...

The principal's fever increased due to the blank answer sheets of class XII | बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांमुळे प्राचार्यांचा ताप वाढला

बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांमुळे प्राचार्यांचा ताप वाढला

परीक्षा लांबल्या, साहित्य सांभाळून ठेवण्याचे शाळांना आदेश

अमरावती : दरवर्षी बोर्ड विद्यार्थ्यांची परीक्षा घेते. पण, यंदा परीक्षेमुळे खुद्द बोर्डाचीच धाकधूक वाढली आहे. कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्दचा निर्णय झाला. आता बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या. त्यामुळे तत्पूर्वीच शाळांना वाटप केलेल्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सीलबंद उत्तरपत्रिका महिनाभर ‘कस्टडी’त सांभाळून ठेवण्याची संवेदनशील जबाबदारी शाळांवर येऊन पडली आहे. त्यामुळे मुख्याध्यापक, प्राचार्यांचा ताप वाढला आहे.

दहावी-बारावीची परीक्षा यंदा २३ व २९ एप्रिलपासून जाहीर करण्यात आली होती. मात्र, वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ शासनावर आली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु, बारावीच्या परीक्षा कधी होतील, हे जाहीर केले नाही. आधी एप्रिलमध्येच परीक्षा जाहीर केल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्र संचालकांना परीक्षेचे साहित्य वाटप करून टाकले. अमरावती विभागीय मंडळानेही अमरावती येथे प्रतिनिधी पाठवून शाळांपर्यंत साहित्य पोहोचविले. मात्र, परीक्षा केंद्रापर्यंत हे साहित्य पोहोचले आणि दुसऱ्याच दिवशी परीक्षेची तारीख लांबल्याची घोषणा झाली. आता या साहित्याचे काय करावे, असा प्रश्न शाळांपुढे निर्माण झाला आहे.

---------

हे साहित्य आहेत कस्टडीत

या साहित्यांमध्ये कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी ग्राफ, मॅप, होलोक्रॉस्ट, स्टिकर, सिटींग प्लॅन, ए,बी लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य, ओएमआर गुणपत्रिका आदींचा समावेश आहे. आता हे साहित्य केंद्र संचालकांनी स्वत:च कस्टडीत जपून ठेवावे, संबंधित शाळांना वाटप करू नये, असे आदेश अमरावती विभागीय मंडळाच्या सहसचिव जयश्री राऊत यांनी दिले आहेत.

------------------

परीक्षा मे अखेर, पुढील प्रवेशाचा गुंता कायम

जिल्ह्यात यंदा कोरोनामुळे परीक्षा केंद्राची संख्या वाढली आहे. यंदा बारावीची परीक्षा मे अखेर घेण्याचे नियोजन आहे. कोरोनाची स्थिती बघून बारावी परीक्षांचे नियोजन केले जाईल, अशी माहिती आहे. विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात, तेथेच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. ही वाढीव संख्या पाहता अनेक केंद्र संचालकांनी आपल्या उपकेंद्रांना हे साहित्य तडकाफडकी वाटून टाकल्याचीही शक्यता आहे. आता अशा लॉक्ड उत्तरपत्रिकांबाबत गफलत झाल्यास परीक्षेत मोठा घोळ होण्याची शक्यता आहे.

---------------------

जिल्ह्यात ३५,१३२ हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

जिल्ह्यात तब्बल ३५,१३२ हजार विद्यार्थी यंदा बारावीला आहेत. कोरोनामुळे शाळा होवो न होवो, पण वर्ष महत्त्वाचे असल्याने या विद्यार्थ्यांनी जमेल तशी परीक्षेची तयारी केली आहे. त्यात शाळांनीही विविध उपक्रमांतून तयारी करवून घेतली. परंतु, आता परीक्षेची तारीख लांबली, त्यावर कोरोनामुळे परीक्षा नेमकी कधी घेतली जाणार, घेणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

-------------------

दहावीचे परीक्षार्थी

४०६६३

बारावीचे परीक्षार्थी

३५१३२

-------------

परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. शासनाने बारावी परीक्षेची तारीख जाहीर करताच परीक्षांचे नियोजन केले जाईल. ऑफलाईन परीक्षा होतील, असे संकेत आहेत. मात्र, परीक्षा कधी होणार, हे शासनाने स्पष्ट केले नाही.

- दीपक धोटे, प्राचार्य, ब्रजलाल बियाणी महाविद्यालय अमरावती

--------

बारावीच्या परीक्षा २३ एप्रिलपासून घेण्याबाबतची तयारी झाली होती. मात्र, परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. शासनाने तारीख, वेळापत्रक जाहीर करताच कॉलेजस्तरावर कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा घेण्यात येतील. काहीही अडचण येणार नाही.

- व्ही.जी. ठाकरे, प्राचार्य, श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय. अमरावती

Web Title: The principal's fever increased due to the blank answer sheets of class XII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.