अडगाव विषबाधा प्रकरणात अखेर शाळेच्या मुख्याध्यापकाचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:39 IST2025-01-09T13:38:21+5:302025-01-09T13:39:19+5:30

Amravati : मदतनीस, स्वयपांकी यांच्यावर कारवाईची टांगती तलवार

Principal finally suspended in Adgaon poisoning case | अडगाव विषबाधा प्रकरणात अखेर शाळेच्या मुख्याध्यापकाचे निलंबन

Principal finally suspended in Adgaon poisoning case

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
मोर्शी तालुक्यातील अडगाव येथे शालेय पोषण आहारातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. याप्रकरणी आठवडाभरानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी अडगाव शाळेचे मुख्याध्यापक दिनेश भागवत यांना निलंबन कारवाईचे आदेश ८ जानेवारी रोजी जारी केले आहेत. याच प्रकरणी शाळेतील मदतनीस व स्वयंपाकी यांनी सादर केलेला खुलासा अमान्य करून त्यांच्या पुढील कारवाईबाबतचे पत्र संबंधित शाळा व्यवस्थापन समितीला दिल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सुत्रांनी दिली.


मोशी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या अडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २८ डिसेंबर रोजी शालेय पोषण आहारातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. या घटनेत १८ गंभीर विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे जिल्हा परिषद यंत्रणा हादरली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता झेडपीच्या सीईओ तथा प्रशासक संजिता महापात्र यांनी तातडीने इर्विन रुग्णालयात पोहोचून बाधित विद्यार्थ्यांची आस्थेने प्रकृतीची माहिती जाणून घेतली होती. तसेच खासदार बळवंत वानखडे यांनीही याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना चौकशी करण्याचे सीईओंनी आदेश जारी केले होते. दरम्यान, या प्रकरणाचा अहवाल शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला आहे.


या अहवालानुसार आहार शिजवणे, वाटप करणे, या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची आहे. मात्र, यावर नियंत्रण ठेवण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत मुख्याध्यापक दिनेश भागवत सेवा (वर्तवणूक) नियम १९६७चा नियम ३चा भंग केल्याने निलंबन कारवाई केल्याचे आदेशात नमूद आहे. भागवत यांचे निलंबन कालावधीचे मुख्यालय धारणी पंचायत समिती देण्यात आले आहे.


"अडगाव येथील जि. प. शाळेत घडलेल्या विषबाधा प्रकरणात मुख्याध्यापक दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर निलंबन कारवाई केली आहे, तर मदतनीस व स्वयंपाकी यांचे खुलासे अमान्य करीत त्यांच्यावर पुढील कारवाईबाबतचे पत्र संबंधित शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहे." 
- अरविंद मोहरे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि. प., अमरावती

Web Title: Principal finally suspended in Adgaon poisoning case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.