The Principal cannot deny the Vice-Chancellor degree; The 'Nuta' organization is aggressive | कुलगुरूंनी दिलेली पदवी प्राचार्य नाकारू शकत नाही; ‘नुटा’ संघटना आक्रमक

कुलगुरूंनी दिलेली पदवी प्राचार्य नाकारू शकत नाही; ‘नुटा’ संघटना आक्रमक

अमरावती : कुलगुरू, कुलपतींच्यावतीने बहाल केलेली आचार्य पदवी नाकारण्याचा अधिकार प्राचार्यांना नाही, अशी आक्रमक भूमिका घेत नुटा संघटनेने मंगळवारी संस्थाध्यक्षांची भेट घेतली. नेरपरसोपंत येथील नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस. सदन यांच्या कारभारावर त्यांनी बोट ठेवले. शिक्षकांचे प्रश्न, समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.

नेहरू महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक मधुकर वडते यांनी पीएच.डी. ही प्राचार्यांची परवानगी न घेता मिळविली. त्यामुळे या पदवीची नोंद महाविद्यालयात घेणार नसल्याची भूमिका प्राचार्य आर.एस. सदन यांनी घेतली आहे. त्यामुळे सहायक प्राध्यापक वडते यांची आचार्य पदवी केवळ कागद म्हणून ठरणार आहे. हे प्रकरण वडते यांनी ‘नुटा’ संघटनेत नेले.

प्राचार्य सदन हे शिक्षकांना कशा प्रकारे त्रास देतात, याचे पुरावे संघटनेकडे सादर केले. त्यानुसार ‘नुटा‘ संघटनेच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी नेहरू महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष परमानंद अग्रवाल यांची भेट घेत त्यांच्यासमोर प्राचार्यांच्या नियमबाह्य कारभाराचा पाढा वाचला. पीएच.डी. पदवी मिळविण्यासाठी प्राचार्यांची परवानगी घेण्याची कोणतीही नियमावली नाही. असे असताना वडते यांनी मिळविलेल्या पदवीची नोंद घेण्यास प्राचार्यांनी नकार दिल्याचे नुटाने सांगितले.

शिक्षकांना होणारा त्रास, मानसिक छळ थांबिवण्याची मागणी संस्थाध्यक्ष अग्रवाल यांच्याकडे करण्यात आली. यावेळी प्रवीण रघुवंशी, विवेक देशमुख, सतेश्वर मोरे, नितीन चांगोले, सुभाष गावंडे, आर. भांडवलकर, उमेश कडू, विकास टोेणे आदी उपस्थित होते.

सेवापुस्तिकेत नोंद न घेण्यास प्राचार्यांचा नकार

नेहरू महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक मधुकर वडते यांनी सन २०१७ मध्ये पीएच.डी. पदवी मिळविली. मात्र, त्यांच्या नावासमोर डॉक्टर, असे लागणार नाही, सेवापुस्तिकेत नोंद घेणार नाही आणि लाभही मिळणार नाही, असे लेखी पत्र प्राचार्य सदन यांनी लिहून दिले होते. एकप्रकारे कुलगुरूंनी प्रदान केलेल्या पदवीचा हा अपमान असल्याचा आरोप नुटा संघटनेचे प्रवीण रघुवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

Web Title: The Principal cannot deny the Vice-Chancellor degree; The 'Nuta' organization is aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.