The president of the madrasa Mufti Ziaullah Khan Arrest, | मदरशाचा संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खान गजाआड
मदरशाचा संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खान गजाआड

ठळक मुद्देदोन दिवसांची पोलीस कोठडी : आरोपी फिरदौस फरारच

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मदरशातील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असणारा मुफ्ती जियाउल्ला खान याला नागपुरी गेट पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास नागपूरहून अटक केली. बुधवारी चोख पोलीस बंदोबस्तात त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी जमली होती. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लालखडी रिंंगरोडवर जामियानगर स्थित जामिया इस्लामिया बुस्तान-ए-फातेमा लिल्बनात या मदरशाचा संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खानविरुद्ध पीडिताच्या वडिलांनी नागपुरी गेट पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी त्याच्यासह गुन्ह्यात सहकार्य करणाऱ्या फिरदौस नामक महिलेविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (एन), ३७६ (अ) (ब) (ड), ३४२, ३२३,, ५०६, ३४ व ६, ६, १७ पोक्सो अन्वये गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच दोघेही पसार झाले. नागपुरी गेट पोलिसांनी शोधकार्य सुरू केले असता, तो नागपुरात होता. या माहितीवरून नागपुरी गेटचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक प्रशांत लभाने, हवालदार प्रमोद गुडधे, आबीद शेख, विक्रम देशमुख, अकील खान यांचे पथक नागपूर रवाना झाले. सायबर पोलिसांच्या मदतीने नागपुरी गेट पोलिसांनी मुफ्ती जियाउल्ला खानचे लोकेशन घेऊन त्याला नागपूरच्या गांधी बाग परिसरातून अटक केली. अमरावतीला आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर त्याला राजापेठ ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले. बुधवारी त्याला कोठडीतून बाहेर काढून जिल्हा न्यायाधीश (७) तथा अपर सत्र न्यायाधीश ए.व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी अभियोक्ता परीक्षित गणोरकर व सहायक सरकारी वकील पी.पी. तापडिया यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडून आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली.

पळून जाण्याच्या बेतात होता जियाउल्ला खान
गांधी बाग परिसरातील एका वकिलाच्या घराजवळच भाड्याच्या खोलीत मुफ्ती जियाउल्ला खान लपून बसला होता. तो तेथून पळून जाण्याच्या बेतात असतानाच पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचा व्हिडीओ मुस्लिम बांधवांची सहानुभूती मिळविण्यासाठी व दिशाभुल करण्यासाठी व्हायरल केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

मुफ्तीच्या समर्थनात मुलींचे व्हिडीओ व्हायरल; गुन्हा दाखल करणार
मुफ्ती जियाउल्ला खान चांगली व्यक्ती असल्याबद्दल त्याच्या काही समर्थकांनी मदरशातील मुलींचे व्हिडीओ रेकॉर्ड करून ते व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केले. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये मदरशातील मुली मुफ्ती जियाउल्ला खानच्या समर्थनात बोलत आहेत. पाचपैकी एका व्हिडीओत चक्क पीडिताचे नाव, गावसुद्धा सांगितल्याची चर्चा आहे. पोक्सो कायद्यान्वये पीडिताचे नाव उघड करणे हे गुन्हा ठरते. त्यामुळे व्हिडीओ काढणारा व तो व्हायरल करणाºया व्यक्तींना सहआरोपी बनविले जाण्याची शक्यता आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ रेकॉर्डिंगची पडताळणी पोलिसांनी सुरू केली असून, त्यात पीडिताची माहिती उघड केल्याचे दिसून आल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करू. याशिवाय मदरशातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या घटनेबद्दल पूर्वीच माहीत असेल, तर पोक्सो कायद्यान्वये त्यांनाही आरोपी बनवू, अशी माहिती पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी दिली.

न्यायालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप
आरोपी मुफ्ती जियाउल्ला खानने या कृत्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अशा स्थितीत त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता पाहता, त्याला न्यायालयात हजर करण्यापूर्वीच सतर्कता बाळगली गेली. पोलिसांनी न्यायालयाच्या चौफेर पोलीस बंदोबस्त लावून ठेवला होता. ज्या न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. तेथे पोलिसांचा मोठा ताफा तैनात होता. तगड्या बंदोबस्तात जियाउल्ला खानला चेहºयावर काळा कपडा लावून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी बाहेरील कुठल्याही व्यक्तींना इमारतीच्या आत जाऊ दिले नाही. जियाउल्ला खानला पाहण्यासाठी न्यायालयाच्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती तसेच धावपळ सुरु होती.

आरोपी मुफ्ती जियाउल्ला खान पळून जाण्याचा बेतात असताना, त्याला नागपुरातून अटक करण्यात आली. न्यायालयात पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली असून, त्यानंतर आरोपीला इन्ट्रोगेट करू. पीडिताचे नाव उघड करणाºयांनासुद्धा सोडले जाणार नाही. व्हिडीओची पडताळणी करून तो व्हायरल करणाºयांना आरोपी बनवू.
- यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त.

Web Title: The president of the madrasa Mufti Ziaullah Khan Arrest,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.