जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक ‘सीईओ’ करणार सादर
By Admin | Updated: February 17, 2017 00:26 IST2017-02-17T00:26:23+5:302017-02-17T00:26:23+5:30
जिल्हा परिषदेत नवीन शिलेदार १५ मार्चपूर्वी येणार असले तरी विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ २१ मार्चला

जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक ‘सीईओ’ करणार सादर
शासनाचा निर्णय : नव्या पदाधिकाऱ्यांना ‘अंतिम’चा अधिकार
अमरावती : जिल्हा परिषदेत नवीन शिलेदार १५ मार्चपूर्वी येणार असले तरी विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ २१ मार्चला संपणार असल्यामुळे अंदाजपत्रक सादर करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर शासनाने एक परिपत्रक काढून जिल्हा परिषदेला १५ मार्चला अंदाजपत्रक सादर करावे, त्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांनी ते अंतिम करावे अशी सूचना दिली आहे.
जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समितींसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यानंतर नूतन सदस्यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे. पण, विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ २१ मार्च रोजी संपत असल्यामुळे महिनाभर नवीन पदाधिकाऱ्यांना थांबावे लागणार आहे. जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक २७ मार्चपूर्वी सादर करावे लागणार आहे. यामुळे अंदाजपत्रक सादर करण्यावरून आजी-माजी सदस्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी शासनाने जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना तो सादर करण्याची सूचना दिली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी १५ मार्चपूर्वी अंदाजपत्रक सादर करणार आहेत. त्याआधी २५ फेब्रुवारीपूर्वी १४ पंचायत समितींचे अंदाजपत्रक संबंधित गटविकास अधिकारी सादर करणार आहेत. तेच अंदाजपत्रक जिल्हा परिषदेकडे आल्यानंतर जिल्ह्य़ाचे एकत्रित अंदाजपत्रक सादर होईल. यानंतर नवीन पदाधिकारी या अंदाजपत्रकास अंतिम मंजुरी देणार आहेत.