आंबिया बहरातील संत्र्याच्या तडणीला अवकाळीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST2020-01-03T06:00:00+5:302020-01-03T06:00:32+5:30
शेतकऱ्यांनी आंबिया बहराची संत्री घेण्याकरिता बागांची मशागत करून १ डिसेंबरपासून बागा तडणीवर सोडल्या. १० ते १५ जानेवारीपासून बागामध्ये रासायनिक खते फेकून व झाडावर फवारणी करून पाणी देण्याला सुरुवात केली जाते. मात्र, बागांना तडण बसण्याअगोदरच अवकाळी पावसाने मधातच हजेरी लावल्यामुळे संत्राफुटीचे स्वप्न पाहणाºया शेतकऱ्यांच्या स्वप्नावर विरजण पडले.

आंबिया बहरातील संत्र्याच्या तडणीला अवकाळीचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
पथ्रोट : २०१९ च्या शेवटच्या दिवशीच अचलपूर तालुक्यात पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे आंबिया बहराचे पीक घेण्याकरिता तडणीवर सोडलेल्या संत्राबागांना पुन्हा पावसाचा तडाखा बसला. आंबिया बहराचे संत्रा पीक तडण तुटल्यामुळे धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आंबिया बहराची संत्री घेण्याकरिता बागांची मशागत करून १ डिसेंबरपासून बागा तडणीवर सोडल्या. १० ते १५ जानेवारीपासून बागामध्ये रासायनिक खते फेकून व झाडावर फवारणी करून पाणी देण्याला सुरुवात केली जाते. मात्र, बागांना तडण बसण्याअगोदरच अवकाळी पावसाने मधातच हजेरी लावल्यामुळे संत्राफुटीचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नावर विरजण पडले.
अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, परसापूर, धामणगाव गढी, बहिरम, भिलोणा, एकलारा, शहानूर, रामापूर, हरम, खानजमानगर आदी गावांमध्ये आंबिया बहाराची संत्री घेतली जातात. संत्रा पीक हे शेतकऱ्यांचे ठोक व एकरकमेचे पीक आहे. आंबिया बहराच्या संत्रा पिकावर शेतकऱ्यांची वर्षभराच्या व्यवहाराची दारोमदार आहे. तूर, कपाशी, सोयाबीन आदी पिके वाढती मजुरी, बाजारात मालाला मिळणारा कमी दर, रासायनिक खताचे, औषधाचे वाढलेले दर, दिवसेंदिवस येणारी नैसर्गिक आपत्ती आदी बाबी लक्षात घेता परवडणारी नाही. त्यामुळे संत्रा पिकांकडे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कल दिसून येत आहे आणि ज्या भागात भरपूर पाणी आहे, त्याच भागात जास्तीत जास्त शेतकरी संत्रा पीक घेतात.
तुरीलाही फटका
मंगळवारी सकाळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या तुरीचे पीक दवामुळे खराब झाले. तसेच कापसाच्या पिकावरही लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापसाचे पिकही हातातून गेले. दिवसेंदिवस येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असून, लागलेला पैसा पिकामधून निघत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारीच होत चालल्याचे चित्र स्पष्ट आहे.