Precipitation in Chhildara taluka | चिखलदरा तालुक्यात अतिवृष्टी
चिखलदरा तालुक्यात अतिवृष्टी

ठळक मुद्देसलोन्यात घर कोसळले : नंदनवनात दोन हजार मिलिमीटरचा आकडा पार

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मागील २४ तासांत तालुक्यातील दोन महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. शुक्रवारी सकाळी ८ च्या नोंदीनुसार, तालुक्यात ७९.७ मिमी पाऊस झाला. सलोना येथे एका घराची पडझड झाल्याची माहिती आहे.
चिखलदऱ्यात शुक्रवारी सकाळी १०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यासोबतच यंदा चिखलदºयात आतापर्यंत दोन हजार मिलिमीटर पाऊस कोसळल्याची नोंद पाटबंधारे विभागाच्या अप्पर प्लेटो येथील पर्जन्यमान केंद्रावर झाली आहे. टेम्ब्रुसोंडा महसूल मंडळात ५३ मिमी, चिखलदरा १३०.३ मिमी, चुरणी ६०.४० मिमी, तर सेमाडोह महसूल मंडळात ८५.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात जून ते सप्टेंबर या पावसाच्या कालावधीत एकूण १५२६.७ मिमी. १३ सप्टेंबरपर्यंत १३४२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात १०३ दिवसांमध्ये आतापर्यंत १६१० मिलिमीटर एवढा पाऊस झाला. गतवर्षी ८४१.९ मिलिमीटर एवढी पावसाची नोंद होती. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाच्या १०३ दिवसांमध्ये १०५.५ टक्के पाऊस कोसळला.
बैल जखमी
नजीकच्या सलोना येथे गुरुवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास बंडू पांडू तोटा यांचे घर कोसळले. यात सुदैवाने घरातील सदस्यांना कुठलीच दुखापत झाली नाही. मात्र, गोठ्यात बांधलेला बैल जखमी झाला. बंडू पांडू तोटा, बुली बंडू तोटा, अमित बंडू तोटा हे घरात झोपले असताना मुसळधार पावसाने मातीच्या घराची भिंत कोसळली.


Web Title: Precipitation in Chhildara taluka
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.