‘त्या’ वृध्दाने आरएमओ कक्षासमोरच सोडले प्राण
By Admin | Updated: December 23, 2015 00:10 IST2015-12-23T00:10:44+5:302015-12-23T00:10:44+5:30
गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘आरएमओ’ यांच्या कक्षासमोरच सोमवारी रात्री एका अनोळखी वृध्दाने प्राण सोडले.

‘त्या’ वृध्दाने आरएमओ कक्षासमोरच सोडले प्राण
अमरावती : गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘आरएमओ’ यांच्या कक्षासमोरच सोमवारी रात्री एका अनोळखी वृध्दाने प्राण सोडले. त्यामुळे अशा निराधारांना आरोग्य सेवा पुरविणार तरी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
निराधारांसाठी महापालिकेमार्फत निवासाची सोय करण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी वृध्द, महिला भटकंती करताना आढळून येतात. उदरनिर्वाहासाठी त्यांना भीक मागावी लागते. अलीकडे जिल्हा सामान्य रुग्णालय गोरगरीब निराधारांचे आश्रयस्थान बनले आहे. इर्विन चौक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आवारात दररोज चार ते पाच वृध्द पाय पोटाशी घेऊन पडून असतात. त्यांची चौकशी करण्याची व त्यांना मदत देण्याची गरज आणि सवड कोणालाच नसते. या परिसरातून ये-जा करणारे लोक जे काही पैसे देतात त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतोे. मात्र, या निराधार, बेघरांना आरोग्याची सुविधा पुरविण्याची गरज असताना ती पुरविणार कोण, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. अशाच प्रकार सोमवारी मध्यरात्री इर्विनमध्ये घडला.
जिल्हा सामन्य रूग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (आरएमओ) कक्षासमोर दोन दिवसांपासून एक अनोळखी वृध्द झोपून होता. तो तिथे कसा आणि केव्हा आला? हे कुणालाच ठाऊक नव्हते. तेथील काही कर्मचाऱ्यांनी त्या वयोवृध्दासाठी जेवणाची सोय करून दिली. त्यामुळे त्याने रात्रभर कसाबसा तग धरला.
मात्र, मंगळवारी सकाळी त्या वयोवृध्दाने प्राण सोडले. जिल्हा सामान्य रूग्णालयात अनेक गोरगरीब, गरजुंना आरोग्य सेवा पुरविली जाते. मात्र, ज्यांचा कुणीच वाली नाही. त्यांना आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रूग्णालयात कुणीही स्वीकारत नाही, हे या घटनेवरून दिसून आले.
रुग्णालयाची अनास्था
अमरावती : वेळ असतानाच त्या वयोवृध्दाला उपचार मिळाले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते. मात्र, तो कोण?, कुठला, त्याचे नाव, गाव, पत्ता माहित नसल्याने इर्विनच्या कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नाही. आरएमओच्या कक्षासमोरच त्याने प्राण सोडले. रुग्णालयाबाहेर गंभीर अवस्थेत उपचाराच्या प्रतीक्षेत पहुडलेल्या निराधारांच्या उपचारांची सोय करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)