सत्तेसाठी काँग्रेस, भाजपात जोरदार रस्सीखेच
By Admin | Updated: September 20, 2014 23:41 IST2014-09-20T23:41:50+5:302014-09-20T23:41:50+5:30
विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या रविवारी होणाऱ्या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी काँग्रेस आणि भाजप

सत्तेसाठी काँग्रेस, भाजपात जोरदार रस्सीखेच
अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या रविवारी होणाऱ्या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. संख्याबळाची कसरत करताना नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
५९ सदस्य संख्या असलेल्या अमरावती जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य संख्या काँग्रेस पक्षाजवळ आहे. त्यानंतरही सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेस पक्षाने यावेळी सत्ता काबिज करण्याची खुणगाठ बांधून ३१ सदस्यांची जुळवाजुळव केल्याचा दावा केला जात आहे.
दुसरीकडे भाजप-शिवसेनेनेही आपल्याजवळ सत्तेसाठी लागणारा मॅजिक फिगर असल्याचा दावा केला केला आहे. हा आकडा कायम राहून निवडणुकीत त्याचा परिणाम होण्यासाठी पक्ष नेत्यांच्या बैठकींना वेग आला आहे.
नव्या दमाने पुन्हा सत्तेसाठी आरूढ होण्याचे मनसुबे दोन्ही बाजूने रचले जात आहेत. जिल्हा परिषदेत सर्वाधिक २५ एवढे संख्याबळ काँग्रेस जवळ आहे. हे संख्याबळ असतानाही मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना, भाजप व अन्य पक्षांशी हातमिळवणी करून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद काबीज केले होते. या निवडणुकीतून काँग्रेसला बाजुला सारले होते. हा इतिहास लक्षात घेता काँग्रेस अजूनही राष्ट्रवादीवर भरोसा ठेवायला तयार नाही.
यावेळी काँग्रेसनेही इतर लहान पक्षांच्या सदस्यांची जुळवाजुळव करुन मॅजिक फिगर पूर्ण करणारी समिकरणे जुळविल्याची माहिती आहे. अशातच शिवसेना-भाजप पक्षानेही मागील वेळीप्रमाणे यंदाही सत्तेसाठी विविध घडामोडी करुन सत्तेची चावी आपल्या हातात ठेवण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. शनिवारी दिवसभर जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी विविध घडामोडी सुरू होत्या. (प्रतिनिधी)