विधानपरिषदेतून राज्यमंत्रिपद मिळविण्याचा बहुमान पोटेंना!
By Admin | Updated: December 6, 2014 00:39 IST2014-12-06T00:39:48+5:302014-12-06T00:39:48+5:30
विधानपरिषदेच्या निवडणुकीत २०१२ मध्ये निवडून आलेले आ. प्रवीण पोटे यांना पहिल्याच टप्प्यात मंत्रिपदाची लॉटरी लागली.

विधानपरिषदेतून राज्यमंत्रिपद मिळविण्याचा बहुमान पोटेंना!
गणेश वासनिक अमरावती
विधानपरिषदेच्या निवडणुकीत २०१२ मध्ये निवडून आलेले आ. प्रवीण पोटे यांना पहिल्याच टप्प्यात मंत्रिपदाची लॉटरी लागली. विधानपरिषदेतून राज्यमंत्री होण्याचा बहुमान मिळविणारे ते जिल्ह्यातील पहिले आमदार ठरले.
शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजप, सेनेच्या प्रत्येकी १० मंत्र्यांनी शपथ घेतली. यात कॅबिनेट व राज्यमंत्र्यांचा समावेश होता. मात्र, विधानपरिषेदत अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थांचे भाजपचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदार प्रवीण पोटेंच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. शिक्षण क्षेत्रातील भरघोस योगदानासह सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या प्रवीण पोटे यांची राजकीय वाटचालही तेवढीच निष्कलंक आहे. यशस्वी उद्योजक म्हणूनही ते परिचीत आहेत. मितभाषी व अजातशत्रू प्रवीण पोटेंचे सर्वच राजकीय पक्षांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. पहिल्याच ‘एन्ट्री’त पोटेंनी मंत्रिपद खेचून आणल्याने भाजपचे जुने-जाणते अंतर्मुख झाले आहेत. संघाशी जवळीक नसूनही पोटेंनी यश मिळविले, हे विशेष.
बहुजन चेहरा म्हणून पोटेंची ओळख
अमरावती : थेट विधानसभा निवडणूक लढविणे त्यांना सोयीचे नसल्याने पोटे यांनी २०१२ मध्ये पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची उमेदवारी घेतली. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीत असलेला अंतर्गत वाद प्रवीण पोटे यांच्या विजयाला सोईस्कर ठरले, हे विशेष. सामाजिक जाण आणि धार्मिक वृत्ती ही प्रवीण पोटे यांची सतत जमेची बाजू राहिली. त्यामुळे विरोधकांनाही आपलेसे करण्याचे कसब पोटे यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत तारुन गेले. बहुजन समाजाचा चेहरा म्हणून आ. प्रवीण पोटे यांनी भाजपात जोमाने काम सुरु केले. त्यांच्या सोबतीला कालांतराने आ. प्रकाश भारसाकळे हेसुद्धा भाजपत दाखल झाले. पोटे, भारसाकडे ही जोडी भाजपत वेगाने कार्य करू लागली. कालांतराने विधानसभा निवडणुकीत आ. पोटे आणि आ. भारसाकळे यांनी कमालीची जादू दाखवित सुनील देशमुख व रमेश बुदिंले यांना निवडून आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. भाजपात घट्ट पकड बनविल्यानंतर प्रवीण पोटे यांनी वेगाने मुंबई, दिल्लीच्या वाऱ्या सुरु केल्यात. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी सलगी करीत पहिल्या फळीत नेतृत्व सिद्ध करण्यात पोटे हे कमालीचे यशस्वी ठरलेत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या यादीत नाव नसतानादेखील विस्तारात प्रवीण पोटे यांचे नाव अचानक वरिष्ठांकडून येताच अनेकाचे डोळे दीपल्यागत झाले. पोटे हे राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी येथील राजापेठस्थित भाजप कार्यालयात फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर करुन आनंदोत्सव साजरा केला. पोटे हे राजकारणात अजातशत्रू म्हणून नावारुपास पुढे आले आहे. मात्र जिल्ह्यात विधान परिषदेतून पहिल्यांदाच मंत्रीपदी विराजमान होण्याचा बहुमान त्यांच्या नावे कोरले जाणार आहे. उद्योजक, आमदार व मंत्री असा प्रवास असलेल्या प्रवीण पोटे यांच्याकडून सामान्यांना बऱ्याच आशा आहेत. समाजाचे सुख-दु:ख, वेदना समजून घेण्याची प्रवीण पोटे यांना कळवळा आहे. त्यामुळे ते मंत्री झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या असून विकासाची स्वप्नेसुद्धा आहेत.