लोकसभा निवडणुकीचा फटका : सात सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 1, 2024 19:21 IST2024-03-01T19:21:00+5:302024-03-01T19:21:12+5:30
सहकार विभागाद्वारा ३१ मेपर्यंत मुदतवाढ

लोकसभा निवडणुकीचा फटका : सात सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती
अमरावती: आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामात सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी व्यस्त राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सात सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करून ३१ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे.
एप्रिल महिन्यात मुदत संपणाऱ्या सात सहकारी संस्थांच्या मतदार यादीची प्रक्रिया आटोपल्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारा २९ फेब्रुवारीपासून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यामध्ये ६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्जाची प्रक्रिया होती व ७ एप्रिल रोजी मतदान व लगेच मतमोजणी करण्यात येणार होती.
मात्र उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच सहकार विभागाचे आदेश धडकले. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी सहकार विभागातील अधिकारी यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्याने बरीचशी पदे रिक्त असल्याचे कारण शासनाच्या या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या संस्थांच्या निवडणुकीला फटका
सावंगा सेवा सहकारी सोसायटी, अमरावती विभाग अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, भारतीय सॅलरी अनर्स क्रेडिट सोसायटी, सम्यक कृषी प्रक्रिया पणन व निर्यातदार मागासवर्गीय सहकारी संस्था, कावली सेवा सोसायटी, श्री गजानन महाराज शेतमाल उत्पादक सहकारी संस्था व शिवणी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक ३१ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे.