प्रगत तंत्राव्दारे बहरली डाळिंबे

By Admin | Updated: March 14, 2015 00:42 IST2015-03-14T00:42:56+5:302015-03-14T00:42:56+5:30

कृषी व्यवसायात नवनवीन बदल होत आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीमध्ये प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक झाला आहे.

The pomegranate blooms with the help of advanced technology | प्रगत तंत्राव्दारे बहरली डाळिंबे

प्रगत तंत्राव्दारे बहरली डाळिंबे

गजानन मोहोड अमरावती
कृषी व्यवसायात नवनवीन बदल होत आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीमध्ये प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक झाला आहे. मूळचे तिवसा तालुक्यामधील शेंदूरजना बाजार येथील सध्या शहरात स्थायिक झालेले राजेश महादेवराव कुरळकर यांची बोरगाव (धर्माळे) येथील १० एकरातील डाळांबाची बाग पाहिल्यावर याची प्रचिती येते.
शेती करायची, परंतु ध्येय समोर ठेवून, यासाठी त्यांनी पश्चिम महाराष्ट्र पालथा घातला. शेकडो बगीच्यांना भेटी दिल्यात, चर्चा केली व फक्त डाळिंबाची लागवड करायचा निश्चय केला. यासाठी वाशीम जिल्ह्यातील बागायतदार कुलदीप पाटील यांचा सल्ला मोलाचा ठरला. सध्या त्यांनी लागवड केलेली डाळिंबाची ३ हजार झाडे दीड वर्षांची झाली आहेत. पहिला बहर आला असून एका झाडाला सध्या १०० ग्रॅम वजनाची ७५ ते १०० फळे आहेत. या बहराला बाजार भाव योग्य मिळाल्यास ५० ते ६० लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माळरानात नव्हे पश्चिम महाराष्ट्रातल्या एखाद्या बगीच्यात तर आपण उभे नाही, असा भास व्हावा, अशा प्रकारे डाळिंबाचा बगीचा बहरला आहे. वास्तविकत: कुरळकर यांचा व्यवसाय ठेकेदारीचा. परंतु शेती करायचीच असा निश्चय करुन त्यांनी नांदगाव पेठ लगतच्या बोरगाव (धर्माळे) या शिवारात १० एकर शेती विकत घेतली. ही मध्यम स्वरुपाची जमीन. येथे विहीर खोदून ३००० भगवा वानाची डाळिंबाची रोपे जालना येथून आणली. दोन रोपांच्या मधात १० फुटाचे अंतर व १४ फुटाचा रस्ता मशागतीसाठी अशी लागवड केली. खासगी कृषी कन्संल्टंटचा सल्ला ते घेतात. दर दोन आठवड्यांनी त्यांची भेट व मार्गदर्शन त्यांना मिळते. शेती करायची परंतु, कृषी तंत्रज्ञानाचा वापर करुनच असे मनाशी ठाम ठरवून सुरूवात केली. दररोज सकाळी ७ त ११ पर्यंत ते स्वत: राबतात.
रोपांना ड्रिप पद्धतीने सिंचन करण्यात येते. सेंद्रीय खत, गांडूळ खत, शेणखत याचाच वापर करण्यात येतो. निंबोळी अर्काचा फवारादेखील मारण्यात येतो. यासाठी त्यांनी गांडूळ खताचा प्लाँट शेतात तयार केला आहे. मशागतीसाठी छोट्या ट्रॅकरचा वापर करण्यात येतो. कीटकनाशक फवारणीसाठी छोट्या ट्रॅक्टरला ‘ब्लोअर’ यंत्र जोडून फवारणी करण्यात येते. सध्या ही झाडे दीड वर्षांची झाली आहे. वर्षाला तीन बहर डाळींबाचा येतात. यामध्ये पाणी मुबलक असल्यास हस्त, कमी असल्यास मृग व आंबिया बहर उपयोगाचा असतो, असे त्यांनी सागितले.
सुरूवातील उत्पादन खर्च येतो. परंतु हा उत्पादन खर्च पहिल्याच बहरात निघतो. नंतर झाडांची वाढ होते. फळांच्या संख्येतही वाढ होते. त्या तुलनेत उत्पादन खर्च कमी आहे. मात्र उत्पन्न अधिक आहे. प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा सहकार्याने शेतीमधून हमखास असे उत्पन्न घेता येते. पहिला बहर एकरी किमान ५ लाखांचे उत्पन्न देतो. दरवर्षी फळांची संख्या वाढून कमी उत्पादन खर्चात भरघोस उत्पन्न घेता येते, असे त्यांनी सांगितले.
पहिले नियोजन, मग सुरूवात
पहिले नियोजन करावे व मग सुरूवात करावी, हा यशस्वी होण्याचा मूलमंत्र आहे. शेती करायची तर काय करावे, यासाठी राज्यात ३००० किमी फिरलो, प्रगत शेती आपल्या भागात कशी करता येईल याचे नियोजन केले. डाळिंबाची बाग करायची असे मनासी ठाम करुन सुरूवात केली. दरदिवशी किमान सहा तास शेतीला देतो. नंतर इतर व्यवसाय सांभाळतो. शेतीचे दर दिवसाचे नियोजन ठरले आहे. दर १५ दिवसांनी खासगी तज्ज्ञांचा सल्ला घेतो. पहिलाच बहर आला आहे. लोकं भेट देतात, योग्य भाव न मिळाल्यास स्वत: मार्केटिंग करु ६० ते १०० रुपये किलोपर्यंत भाव आहे. या अंदाजाने किमान ५० ते ६० लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. जिल्ह्यातील युवकांनी पारंपरिक शेतीसोबत प्रगत कृषितंत्रज्ञानाचा वापर करावा, असे राजेश कुरळकर यांनी सांगितले.
१८ महिन्यांनंतर बहराला सुरूवात
संत्र्याचे उत्पादन साधारणपणे पाचव्या वर्षांपासून सुरू होते. याउलट डाळिंबाला २५ ते १८ महिन्यांनंतर पहिला बहर घेता येतो. यासाठी तंज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार झाडाची फवारणी करुन पानगळ करावी लागते. दोन आठवड्यांनंतर झाडाला फुले येण्यास सुरूवात होते. झाडाच्या क्षमतेनुसार फुले ठेवावी. कुरळकर यांच्या शेतातील दीड वर्षांच्या एका झाडाला साधारणपणे ७५ ते १०० फळे आहेत. एका फळाचे वजन १०० ग्रॅम आहे. फळाच्या दर्जाची काळजी घ्यावी लागते. दररोज काय काम करावे, याचा तपशील तयार आहे.

Web Title: The pomegranate blooms with the help of advanced technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.