धक्कादायक; पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाईल लुटला, मारहाणही
By प्रदीप भाकरे | Updated: June 1, 2023 15:45 IST2023-06-01T15:44:54+5:302023-06-01T15:45:12+5:30
इर्विन ते कॅम्प रोडवरील घटना

धक्कादायक; पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाईल लुटला, मारहाणही
अमरावती : दोन टारगटांनी चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल घेऊन पळ काढला. ३० मे रोजी रात्री ८.३० च्या सुमारास इर्विन ते कॅँप रोडवर हा प्रकार घडला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस दलात कार्यरत अंमलदार वसीम अमिर खान पठाण (३९, हबीबनगर) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी २० ते ३५ वर्षे वयोगटातील दोन अनोळखी इसमांविरूद्ध जबरी चोरी व मारहाणीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ३१ मे रोजी एफआयआर नोंदविण्यात आला.
तक्रारीनुसार, वसीम पठान हे ३० मे रोजी दुपारी ड्युटीवर जात होते. दरम्यान इर्विन चौकातील आंबेडकर पुतळ्याजवळील रोडवर मोपेडवर असलेली २० ते ३५ वर्षे वयोगटातील दोन तरूण अकारण येजा करणाऱ्या लोकांना शिविगाळ करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वसीम यांना देखील शिविगाळ केली. त्यावर त्यांना हटकले असता त्यांनी मागे येऊन वसीम यांना पुन्हा शिविगाळ केली. आरोपी शिविगाळ करीत असतांना वसीम पठाण यांनी व्हिडीओ शुटिंग काढली. त्यावेळी मोपेडवर मागे बसलेल्या एका मुलाने वसीम यांचा मोबाईल हिसकावून घेतला.
जमावासमोर मारहाण
मोबाईल हिसकावून ते त्याच रस्त्यावरील एका पक्ष कार्यालयाजवळ जाऊन थांबले. त्यावेळी वसीम हे आरोपींजवळ गेले. तुम्ही असे विनाकारण शिवीगाळ का करता, अशी विचारणा त्यांना केली. त्यावेळी नागरिक देखील जमा झाले. तेव्हा त्या दोन आरोपींनी वसीम यांना मारहाण केली. तथा त्यांचा मोबाईल हिसकावून ते पळून गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.