पोलिसांची तटबंदी
By Admin | Updated: September 22, 2016 00:11 IST2016-09-22T00:11:12+5:302016-09-22T00:11:12+5:30
मराठा समाजाच्या गुरुवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी शहर पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे.

पोलिसांची तटबंदी
अमरावती : मराठा समाजाच्या गुरुवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी शहर पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. बुधवार सायंकाळपासूनच पोलिस रस्त्यावर उतरले आहेत.या मोर्चासाठी १ हजार २३८ पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत.
गुरूवारी नेहरु मैदानातून मराठा मूकमोर्चा निघणार आहे. या मोर्चात सुमारे ५ लाख मराठा समाज बांधव सहभागी होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. हा मोर्चा नेहरु मैदान, राजकमल चौक, शाम चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार असून त्याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. त्याचप्रमाणे इर्विन चौकात उडणारा अश्वपुतळा बसविण्यात येणार आहे. अश्वाच्या पुतळा बसविण्यास काही नागरिकांनी विरोध दर्शविला असून त्या अनुषंगाने विविध आंदोलने झाली आहेत. त्यामुळे या मोर्चात समाजविघातक घटकांकडून अनुचित प्रकार घडवून आणण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शहर पोलीसांनी ९ सेक्टर तयार केले आहेत.
सेक्टरनुसार पोलीस बंदोबस्त
सेक्टर १ मध्ये नेहरु मैदानाच्या आतील भागात बंदोबस्त लावण्यात येईल.सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या नेत्तृत्वात पोलीस निरीक्षक पाटील, दोन एपीआय व पीएसआय व २० पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. सेक्टर २ मध्ये पाच पोलीस निरीक्षक, १२ एपीआय व पीएसआय, १५० पोलीस कर्मचारी व ५० महिला पोलीस कर्मचारी नेहरू मैदान प्रवेशद्वारापासून राजकमल चौक, शाम चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक व इर्विन चौकापर्यंतचा बंदोबस्त ठेवणार आहे. सेक्टर ३ मध्ये सहायक पोलीस आयुक्त अनिल पंडागळे यांच्या नेतृत्वात चार पोलीस निरीक्षक, ८ एपीआय व पीएसआय, १२० पोलीस कर्मचारी, ४० महिला पोलीस इर्विन चौक, ज्ञानमाता टी-पॉर्इंट, जोग बंगला, गर्ल्स हायस्कूल चौकापर्यंत बंदोबस्त ठेवणार आहे. अशाप्रकारे सेक्टरनुसार पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केलेले आहे. पाच ‘वॉच टॉवर्स’वरील बंदोबस्त
अमरावती : पाच ‘वॉच टावर्स’वरील बंदोबस्तात प्रत्येकी १ पोलीस उपनिरीक्षक व तीन पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. या पोलिसांजवळ वॉकीटॉकी व एक दुर्बिण देण्यात येणार असून ते इर्विन चौक व गर्ल्स हायस्कूल चौकापर्यंत लक्ष केंद्रीत करणार आहे.
‘सबलेन’ बंदोबस्त
‘सबलेन’ बंदोबस्तात सेक्टरमधील सबलेनमध्ये बॅरिकेटसजवळ १ शहर वाहतूक शाखेचा कर्मचारी, १ इतर कर्मचारी व पेट्रोलिंगसाठी दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये खापर्डे बगिचाकडून येणारा मार्ग, होलीक्रॉस शाळेकडून येणारा मार्ग, बारब्दे हॉस्पीटलकडून येणारा मार्ग, टोपेनगराकडून येणारा मार्ग व आयएमए हॉलकडून येणाऱ्या मार्गावर ४० पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत.