पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
By Admin | Updated: August 9, 2014 00:35 IST2014-08-09T00:35:53+5:302014-08-09T00:35:53+5:30
खेळ खेळल्याने मनावरील ताण कमी होऊन नवे चैतन्य निर्माण होते. खेळामुळे आरोग्याची निगा उत्तम प्रकारे राखता येते.

पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
अमरावती : खेळ खेळल्याने मनावरील ताण कमी होऊन नवे चैतन्य निर्माण होते. खेळामुळे आरोग्याची निगा उत्तम प्रकारे राखता येते. टीम वर्कसाठी पोलीस विभागात खेळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे खेळामध्ये पोलिसांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन ब्रिगेडीअर एस.जी. पाटील यांनी केले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या १६ व्या शहर पोलीस क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी दुपारी ४ वाजता पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात ब्रिगेडीअर एस.जी. पाटील यांनी क्रीडा ज्योत पेटवून केले. यावेळी पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला, उपायुक्त सोमनाथ घार्गे, बी.के. गावराने उपस्थित होते. उद्घाटनदरम्यान फुगे सोडून आतषबाजी करण्यात आली.
१० आॅगस्टपर्यंत चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धेत शहर पोलीस दलातील राजापेठ, गाडगेनगर, फ्रेजरपुरा परिक्षेत्र आणि मुख्यालय अशा चार संघांच्या १५६ खेळाडूंचा सहभाग राहणार आहे. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. यातील प्राविण्यप्राप्त खेळाडू राज्य पातळीवर खेळणार असल्याने खेळाडूंनी त्यांच्या खेळाचे चांगले प्रदर्शन दाखवावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले. उद्घाटनानंतर मुख्यालय व राजापेठ संघामध्ये हॉलीबॉल सामना खेळण्यात आला. या सामन्याचा सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनसोक्त आनंद घेतला. कार्यक्रमाचे संचालन उपनिरीक्षक नितीन थोरात व आभार प्रदर्शन उपायुक्त संजय लाटकर यांनी केले. यावेळी सर्व सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धेत १००, २००, ४००, ८००, १५०० आणि ५००० मीटर धावणे, ११० आणि ४०० मीटर अडथळा शर्यत, ४०० बाय १०० आणि ४ बाय ४०० रिले, गोळाफेक, थाळीफेक, कुस्ती, कबड्डी, हॉकी, फुटबॉल, खो-खो, हँडबॉल व हॉलीबॉल या खेळांचा समावेश आहे.