परतवाडा जिल्ह्याच्या मध्य प्रदेश सीमेवर पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST2021-04-22T04:13:56+5:302021-04-22T04:13:56+5:30
निगेटिव्ह नागरिकांना प्रवेश, पोलीस हजर, गुरुजी, आरोग्य कर्मचारी गैरहजर रिॲलिटी चेक/ परतवाडा : कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता पोलीस ...

परतवाडा जिल्ह्याच्या मध्य प्रदेश सीमेवर पोलीस
निगेटिव्ह नागरिकांना प्रवेश, पोलीस हजर, गुरुजी, आरोग्य कर्मचारी गैरहजर
रिॲलिटी चेक/ परतवाडा : कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता पोलीस प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील मध्यप्रदेश सीमेवर राहुटी टाकून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निगेटिव्ह नागरिकांनाच प्रवेश देण्यासोबत रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली आहे. प्रवासी वाहतुकीसाठी हे नियम लागू करण्यात आले आहे. पोलीस यंत्रणा राहुटी टाकून तैनात असली तरी त्यांच्यासोबत पथकात मदतीला दिलेले गुरुजी आणि आरोग्य कर्मचारी चिखलदरा तालुक्यातील डोमा नाक्यावर ‘लोकमत’च्या रिॲलिटी चेकमध्ये गैरहजर आढळून आले.
मध्यप्रदेशातील नागरिकांना सोबत निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आणणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात गेलेले नागरिक पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, याची तपासणी केला जात नसल्याचे चित्र मंगळवारी होते. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त असला तरी आरोग्य कर्मचारी व शिक्षक मात्र गैरहजर आढळून आले. महिन्याभरापूर्वी अलिप्त असलेला मेळघाटला कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, हा भाग कवेत घेतल्याचे चित्र आहे. जिल्ह्याची स्थितीसुद्धा गंभीर असल्यामुळे मध्यप्रदेश सीमारेषेवरील सर्व नाक्यांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. परराज्यातून कोरोनाचा उद्रेक वाढ होण्यापूर्वीच कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कडक लॉकडाऊन चे आदेश निर्गमित केल्यानंतर धारणी, चिखलदरा, शिरजगाव, मोर्शी, शेंदूरजनाघाट, इतर पोलीस ठाण्यांच्या मध्यप्रदेश सीमारेषेवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बॉक्स
पथक बेपत्ता
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्ह्यात कोव्हिड रुग्नांची वाढ होत असल्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्यप्रदेशातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवासी यांचे करीता जिल्हा सिमेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त व आरोग्य पथकासह नाकाबंदी करावी व येणाऱ्या प्रवाशांकडे कोविड-१९ ची नेगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक आहे. कोविड चाचणी निगेटिव्ह असल्याशिवाय प्रवासी वाहतूक व्यक्तीला प्रवेश देऊ नये,असे सक्त आदेश आहेत. मात्र, चिखलदरा तालुक्यातील डोमा नाक्यावर मंगळवारी ‘लोकमत’ने रिॲलिटी चेक केले तेव्हा केवळ पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे मध्य प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी किंवा तपासणी होतच नसल्याचे येथे आढळून आले.
बॉक्स
पोलिसांची राहुटी, वायरलेस यंत्रणा
जीवनावश्यक मालवाहतूक, रुग्णवाहिका यांना अडवणूक करण्याचे बंधन नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना नाक्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आंतरराज्य सीमेवर नाकाबंदी लावण्यात आली असून, राहुटी, बॅरिकेट,
बिनतारी संदेश संच लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बॉक्स
या ठिकाणी चेकिंग पॉईंट
जिल्ह्यातील मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या
बारातांडा, भोकेरबर्डी, रंगुबेली ( धारणी पोलीस ठाणे), काटकुंभ, डोमा (चिखलदरा), खरपी (शिरजगाव), सालबर्डी (मोर्शी), देव नागठाणा, पुसला (शेंदूरजना घाट) आदी ठिकाणी पॉईंट लावण्यात आले आहेत. त्यामध्ये सुसर्दा, बऱ्हाणपूर, भोकरबर्डी, बैरागड, हरदा, कटकुंभ, भैसदेही, बहिरम, शिरजगाव, देऊरवाडा, कांडली, बैतूल मार्ग रिद्धपूर, अंबाडा, पिंपळखुटा मोठा, सिंभोरा, खेड, आष्टी, आठनेर, बैतूल मार्ग, वरुड, शेंदूरजना घाट, पुसला, जरूड, मुलताई पांढुर्णा मार्ग आदी मार्गांवर ये-जा करणाऱ्या प्रवासी वाहतुकीची तपासणी यातून होणार आहे.