पोलिसाचे घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:29+5:30
ग्रामीण पोलीस दलातील अशोक भुसारी यांचे स्वावलंबीनगरात घर असून, ते सेमाडोह येथे पोलीस चौकीत ड्युटीवर असतात. रविवार सकाळी अशोक भुसारी हे कुटुंबीयांसह शेगावला दर्शनासाठी गेले. रात्री ते परतले. दार उघडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये येताच त्यांना सर्व साहित्य अस्तव्यस्त आढळून आले.

पोलिसाचे घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वावलंबीनगरातील रहिवासी असणाऱ्या एका पोलिसाचे घर फोडून चोरांनी तब्बल ३ लाख ४५ हजारांचा ऐवज लंपास केला. अशोक महादेवराव भुसारी (५२) हे शेगावचे दर्शन आटोपून रविवारी रात्री ११ वाजता घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
ग्रामीण पोलीस दलातील अशोक भुसारी यांचे स्वावलंबीनगरात घर असून, ते सेमाडोह येथे पोलीस चौकीत ड्युटीवर असतात. रविवार सकाळी अशोक भुसारी हे कुटुंबीयांसह शेगावला दर्शनासाठी गेले. रात्री ते परतले. दार उघडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये येताच त्यांना सर्व साहित्य अस्तव्यस्त आढळून आले. त्यांनी बेडरूममधील आलमाऱ्यांची तपासणी केली असता, चोरांनी लॉकरमधील ४० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, तेवढ्याच वजनाच्या दोन बांगड्या, १५ ग्रॅमचा गोफ, १० ग्रॅमची अंगठी, प्रत्येकी ५ ग्रॅमचे कानातील अलंकार व अंगठी असे ११५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. गाडगेनगर पोलिसांना त्यांनी घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता, चोरांनी घरामागील सर्र्व्हिस गल्लीतून प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला. सोमवारी सकाळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांनी घटनास्थळाची तपासणी केली.
डॉग स्कॉड गेले २०० मीटरपर्यंत
सोमवारी सकाळी श्वानपथक अशोक भुसारी यांच्या घरी आणले गेले. तेथील साहित्यांच्या गंध दिल्यानंतर श्वान घरापासून २०० मीटर अंतरावर असणाऱ्या हनुमान मंदिरापर्यंत पोहोचले. तेथे ठेवलेल्या खुर्चीला चारदा गवसणी घातली. मात्र, त्यापुढे श्वान गेले नाही.
सळाखीने उघडला मागील दाराचा कडीकोंडा
भुसारी यांच्या घरामागील आवारात बाथरूम व शौचालय आहे. त्यालाच लागून लोखंडी चॅनल गेट आहे. मात्र, वरचा भाग उघडा आहे. त्यामुळे चोरटे सर्व्हिस गल्लीतून भुसारी यांच्या घरामागील बाथरुमवरून आवारात शिरले. मागील दाराच्या गॅपमध्ये त्यांनी लोखंडी सळाखीने कडीकोंडा उघडला.