विषबाधेने आयुषपाठोपाठ आई-वडिलांचाही घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 05:00 IST2021-08-30T05:00:00+5:302021-08-30T05:00:58+5:30

लक्ष्मी बुधराज बछले (३०, रा. डोमा) असे मृताचे नाव आहे. तीन दिवसांपासून जीवन-मरणाच्या संघर्षात झुंज देणाऱ्या या महिलेने रविवारी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी सात वर्षीय मुलगा आयुष, तर शनिवारी पती बुधराज (३५) यांचा मृत्यू झाला. कुटुंबातील उर्वरित आजारी रुग्णांवर परतवाडा व अमरावती येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. 

Poisoning kills parents along with AYUSH | विषबाधेने आयुषपाठोपाठ आई-वडिलांचाही घात

विषबाधेने आयुषपाठोपाठ आई-वडिलांचाही घात

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : तीन दिवसांपूर्वी झालेल्या विषबाधेने गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ३० वर्षीय महिलेने रविवारी अखेरचा श्वास घेतला. मुलगा, पतीनंतर एकाच कुुटंबातील तीन दिवसांत तिघांचा मृत्यू झाल्याने डोमा गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी कारण नसताना संतप्त ग्रामस्थांनी डोमा येथील उपकेंद्राच्या डॉक्टरला मारहाण केली. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी तक्रार देणे सुरू होते. 
लक्ष्मी बुधराज बछले (३०, रा. डोमा) असे मृताचे नाव आहे. तीन दिवसांपासून जीवन-मरणाच्या संघर्षात झुंज देणाऱ्या या महिलेने रविवारी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी सात वर्षीय मुलगा आयुष, तर शनिवारी पती बुधराज (३५) यांचा मृत्यू झाला. कुटुंबातील उर्वरित आजारी रुग्णांवर परतवाडा व अमरावती येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. 
 

आई-वडिलांसाठी मुलगा, पत्नीसाठी पतीचा अंत्यविधी थांबविला
शुक्रवारी पहाटे ५ वाजता आयुषचा मृत्यू झाला. आजारी लक्ष्मी व बुधराज  बरे होऊन येतील, या अपेक्षेने रात्रभर त्याचा मृतदेह थांबवण्यात आला. ते गंभीर आजारी असल्याची माहिती मिळताच शनिवारी अंत्यविधी उरकून परत येताच बुधराजच्या मृत्यूची माहिती धडकली. रविवारी सकाळी अंत्यसंस्काराची तयारी चालविली असताना लक्ष्मीचा मृत्यू झाला. त्यामुळे तिचा मृतदेह येईपर्यंत बुधराजचा थांबविण्यात आला. रात्री उशिरा दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

ग्रामस्थांची डॉक्टरला मारहाण
काटकुंभ आरोग्य केंद्र अंतर्गत डोमा उपकेंद्र येथे कार्यरत डॉ. वैभव सातपुते यांना संतप्त ग्रामस्थांनी मारहाण केली. काटकुंभ पोलीस चौकीत वैद्यकीय अधिकारी डॉ. रागेश्री माहुलकर तक्रार दाखल करणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

मृत्यूचे कारण शोधा
एकाच कुटुंबातील आठ सदस्यांना विषबाधा झाली. त्यातील तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे बलाई समाजात शोककळा पसरली. राजेश सेमलकर, सहदेव बेलकर, दिनेश बछले, कालू गाठे, किशोर झाडखंडे, रवींद्र झाडखंडे, राजेश गाठे, बलदेव पिपरदे, बबलू पिपरदे, मंगल कोगे, देविदास कोगे, जगलाल झाडखंडेसह समाजबांधवांनी सखोल चौकशीची मागणी केली.

विषबाधा वा कशाने मृत्यू झाला, हे तपासणीत अद्याप काही आढळून आले नाही. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर मृत्यूचे कारण कळेल. 
- आदित्य पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी

 

Web Title: Poisoning kills parents along with AYUSH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू