स्वच्छतेच्या कंत्राटासह ‘पीएमसी’चा मुद्दा ज्वलंत !
By Admin | Updated: July 3, 2017 00:34 IST2017-07-03T00:34:36+5:302017-07-03T00:34:36+5:30
आठवडाभराच्या ब्रेकनंतर सोमवारी स्थायी समितीची साप्ताहिक सभा होत असून यात स्वच्छता कंत्राट आणि ...

स्वच्छतेच्या कंत्राटासह ‘पीएमसी’चा मुद्दा ज्वलंत !
आज स्थायीची बैठक : विरोधाची तलवार म्यान ?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आठवडाभराच्या ब्रेकनंतर सोमवारी स्थायी समितीची साप्ताहिक सभा होत असून यात स्वच्छता कंत्राट आणि छत्रीतलावाच्या सौंदर्यीकरणासाठी नेमण्यात आलेल्या पीएमसीच्या मुद्यावर वादळी चर्चा अपेक्षित आहे.
शहरातील दैनंदिन स्वच्छतेचे कंत्राट प्रभागनिहाय न देता एकाच मल्टिनॅशनल कंपनीला देण्याचा ठराव स्थायीने मंजूर केला आहे. सुरुवातीला या ठरावाला विरोधही करण्यात आला. तूर्तास सभापती तुषार भारतीय यांना थेट विरोध करण्याचे धाडस कुणीही दाखवायला तयार नाही. त्यामुळे भारतीय यांनी मल्टिनॅशनल कंपनीला स्वच्छतेचे कंत्राट देण्यासंदर्भातील अटी, शर्ती स्थायीच्या सोमवारच्या सभेत ठेवण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. यासंदर्भातील अटी व शर्ती विधी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्या आहेत. उद्याच्या बैठकीत त्या अटी, शर्ती ठेवल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. छत्री तलाव सौंदर्यीकरणासाठी पीएमसी म्हणून आयुक्तांनी शिक्कामोर्तब केलेल्या ‘फोर्थ डायमेंशन’ला स्थायी समितीने नाकारले आहे.
यात पारदर्शकता न बाळगल्याने पीएमसीसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी,असे निर्देश स्थायी समितीने प्रशासनाला दिले आहेत. तथापि कामाची निकड व अन्य बाबी पाहता पीएमसीसाठी नव्याने निविदा प्रक्रिया तोट्याचे ठरेल. त्यामुळे स्थायी समितीने पुनर्विचार करावा, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र स्थायी समिती नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याच्या भुमिकेवर ठाम असल्याने तिढा निर्माण झाला आहे.या मुद्यावरही स्थायीच्या सोमवारच्या बैठकीत वादळी चर्चा अपेक्षित आहे.