पालकमंत्री प्रवीण पोटे : एकलव्य क्रीडा अकादमीला १० लाखांचा निधीनांदगाव खंडेश्वर : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवीत जिल्ह्याचे नावलौकिक मिळविणाऱ्या एकलव्य क्रीडा अकादमीच्या खेळाडूंनी आॅलिम्पिकमध्ये झेप घ्यावी, यासाठी दर्जेदार खेळाडू निर्माण करण्याकरिता एकलव्य क्रीडा अकादमीला १० लाखांचा निधी देणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले. नांदगाव खंडेश्वर येथे आयोजित व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडला. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी माजी आमदार अरुण अडसड, नगराध्यक्ष प्रताप अडसड, नगराध्यक्ष अक्षय पारस्कर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, प्रशांत वैद्य, हरिचंद्र खंडाळकर, गटनेते प्रमोद पिंजरकर, ठाणेदार रीता उईके, विलास वितोंडे, तहसीलदार बी.व्ही. वाहूरवाघ व अकादमीचे संस्थापक सदानंद जाधव उपस्थित होते.येथील एकलव्य क्रीडा अकादमीच्या मैदानावर दैनंदिन सराव करीत धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात सदानंद जाधव यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत शेकडो खेळाडूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई करीत क्रीडा आरक्षणातून शासकीय सेवेतही संधी मिळवली. ग्रामीण भागातील युवकांत फार मोठी क्षमता असल्याचे सिद्ध केले. दरवर्षी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरात राज्यभरातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येतात. दहा दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात खेळाडूंना दर्जेदार प्रदर्शनाचे कसब शिकविले जाते. यावेळी सादर केलेल्या खेळाडूंच्या उत्कृष्ट प्रदर्शनाने पालकमंत्रीदेखील भारावून गेले. (शहर प्रतिनिधी)
खेळाडूंनी आॅलिम्पिकमध्ये घ्यावी झेप
By admin | Updated: May 3, 2017 00:27 IST