हिरव्याकंच वृक्षांची राजरोसपणे कत्तल!

By Admin | Updated: October 28, 2014 22:50 IST2014-10-28T22:50:47+5:302014-10-28T22:50:47+5:30

शासन विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनावर कोट्यवधी रूपये खर्च करते. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे परिसरात हिरव्याकंच वृक्षांची बेधडक

Planting of green trees! | हिरव्याकंच वृक्षांची राजरोसपणे कत्तल!

हिरव्याकंच वृक्षांची राजरोसपणे कत्तल!

चांदूरबाजार : शासन विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनावर कोट्यवधी रूपये खर्च करते. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे परिसरात हिरव्याकंच वृक्षांची बेधडक कत्तल सुरू असून यामुळे हा परिसर उघडा बोडखा दिसू लागला आहे.
तालुक्यात कधीकाळी वृक्षांचे प्रमाण मोठे होते. परंतु या ना त्या कारणामुळे सतत सुरू असलेल्या वृक्षकटाईमुळे आज वृक्षांची संख्या निम्म्यावर आली आहे. सहा ते सात महिन्यांपासून तालुक्यातील रानवैऱ्यांनी हिरव्या वृक्षांवर कुठाराघात सुरू केला आहे. येथील राजस्व विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने या रानवैऱ्यांच्या विरोधात साधी दंडात्मक कारवाईसुध्दा केलेली नाही. तशी एकही नोंद तहसील दप्तरी नाही. गलेलठ्ठ पगार घेणारे अधिकारी कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे कार्यरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्यात कडुनिंब, बाभळी आदी झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे. वृक्षमाफियांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सतत आर्थिक देवाणघेवाण सुरू असते. त्यामुळेच हे वृक्षमाफिया राजरोसपणे कोणालाही न घाबरता हिरव्यागार वृक्षांची अवैध कत्तल करताना दिसून येतात. या वृक्षमाफियांवर तत्काळ कारवाई करून वृक्षकटाईवर अंकुश न लावल्यास काही काळानंतर तालुक्याला वाळवंटाचे स्वरूप आल्याशिवाय राहणार नाही.
जिल्हाधिकारी व महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांनी अवैध लाकूड तस्करांविरूध्द प्रखल पाऊल उचलून कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या-ज्या ठिकाणी हिरव्यागार वृक्षांची साठवणूक होत असेल त्या-त्या ठिकाणावर नजर ठेवून कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील जागरूक नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Planting of green trees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.