जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडी ‘पिकनिक’ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST2020-01-04T06:00:00+5:302020-01-04T06:00:31+5:30
जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना, अशी महाविकास आघाडी आहे. या तीनही पक्षांच्या नेत्यांची बैठक अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या शासकीय निवास्थानी पार पडली. यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारावर एकमताने शिक्कामोर्तब करण्याचे ठरले.

जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडी ‘पिकनिक’ला
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी ६ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीपर्यंत सदस्य एकत्र राहावे, याची पुरेपूर खबरदारी घेत महाविकास आघाडीने आपल्या सदस्यांना शुक्रवारी पर्यटनवारीवर पाठविले आहे.
जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना, अशी महाविकास आघाडी आहे. या तीनही पक्षांच्या नेत्यांची बैठक अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या शासकीय निवास्थानी पार पडली. यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारावर एकमताने शिक्कामोर्तब करण्याचे ठरले. यावेळी आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर, अनंत साबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्याम देशमुख, आशिष धर्माळे, नाना वानखडे, धनंजय बंड, बाळासाहेब भागवत, उमेश घुरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाभाऊ कुकडे तसेच नेते व सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी काँग्रेस गटनेते बबलू देशमुख, तर उपाध्यक्ष म्हणून शिवसेनेचे दत्ता ढोमणे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सभागृहात काँग्रेस २६, राष्ट्रवादी काँग्रेस (हर्षवर्धन देशमुख गट) २ आणि शिवसेनेचे ३ अशी सत्तारूढ आघाडीची स्थिती आहे. दोन सदस्य नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे विद्यमान सदस्यसंख्या ५७ राहिली आहे. सत्तास्थापनेचा मॅजिक फिगर हा २९ आहे. आघाडीकडे ३२ सदस्य आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष भाजप व मित्रपक्षही सत्ता काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. पुरेसे संख्याबळ जुळत नसल्याने विरोधकांच्या गोटात शांतता आहे.
अन्य पक्षांचे सदस्यही गळाला !
जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीसोबत अन्य काही सदस्य संपर्कात आहेत. तेसुद्धा महाविकास आघाडीला पाठिंबा देतील, असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वर्तविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा आकडा बहुमतापलीकडे जाईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.