जिल्ह्यात पेट्रोलपंपांवर ‘लिटमस’ पेपरच नाहीत
By Admin | Updated: June 10, 2015 00:12 IST2015-06-10T00:12:34+5:302015-06-10T00:12:34+5:30
पेट्रोल व डिझेलमधील भेसळ ओळखण्यासाठी ग्राहकांना ‘लिटमस’ पेपर उपलब्ध करून देणे पेट्रोलपंपधारकांना बंधनकारक

जिल्ह्यात पेट्रोलपंपांवर ‘लिटमस’ पेपरच नाहीत
भोंगळ कारभार : ग्राहक हक्क कायद्याची पेट्रोलपंपधारकांकडून अंमलबजावणी नाही
सुरेश सवळे अमरावती
पेट्रोल व डिझेलमधील भेसळ ओळखण्यासाठी ग्राहकांना ‘लिटमस’ पेपर उपलब्ध करून देणे पेट्रोलपंपधारकांना बंधनकारक असताना या बाबीचे पालन बहुतांश पेट्रोलपंपांवर होताना दिसत नाही. त्यामुळे आपण नेमके कोणते पेट्रोल, डिझेल घेतो याबाबत ग्राहक अनभिज्ञ राहतो. हे वास्तव आहे.
पेट्रोलपंपावर मिळणाऱ्या पेट्रोल व डिझेलमध्ये भेसळ आहे काय, हे तपासण्याचा ग्राहकांना ग्राहक कायद्यानुसार हक्क आहे. ग्राहकास अगदी थोडा जरी संशय आल्यास ‘लिटमस’ पेपरद्वारे नियमानुसार पेट्रोलची तपासणी करता येते. परंतु या सुविधेची माहिती पेट्रोल ग्राहकांना नाही.
नियमानुसार पेट्रोलपंपांवर ‘लिटमस’ पेपर ठेवण्यात येत नाही. परिणामी ग्राहकांच्या हक्काची पायमल्ली राजरोसपणे होत आहे. याकडे पेट्रोलियम विभाग व ग्राहक संघटना दुर्लक्ष करीत असून पंपावर मिळणाऱ्या पेट्रोलमध्ये भेसळ असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. अशा प्रकारच्या भेसळविरूद्ध सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत.
एवढेच नव्हे, तर येथे सूचना फलक, शिल्लक साठा, भाव फलक, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, फ्री एअर चेकींग आदी सुविधाही पुरविणे बंधनकारक आहे. यातील काही सुविधा पुरविली जात असली तरी ‘लिटमस’ पेपरची सुविधा मात्र अजूनही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
यासंबंधी अनेक वाहनचालकांशी संपर्क साधला असता त्यांना ‘लिटमस’ पेपरबाबत काहीही माहिती नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.
आज जिल्ह्यात हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडिया आॅईल व इतर कंपन्यांद्वारे हजारो लिटर पेट्रोल विकले जात आहे. परंतु अधिकार असूनही ग्राहकांना मात्र पेट्रोलची सुविधा तपासता येत नाही. ही पेट्रोल ग्राहकांची शोकांतिका आहे. (प्रतिनिधी)
पेट्रोल
सुविधेविषयी नियम
ग्राहक पेट्रोलियम विभागाच्या नियमानुसार पेट्रोलपंपधारकास ‘लिटमस’ पेपरची मागणी करू शकतो. त्याद्वारे पेट्रोलमधील भेसळ तपासता येते. तसेच पेट्रोल पंपावर ‘लिटमस’ पेपर उपलब्ध करून न दिल्यास पहिल्या पाहणीत १० हजार रूपये, दुसऱ्या वेळी २५ हजार तर तिसऱ्या वेळेस एक लाखांचा दंड तसेच परवाना निलंबनाचीसुद्धा कारवाई होऊ शकते.
अशी ओळखावी लागते भेसळ
पेट्रोलमधील भेसळ ओळखण्यासाठी पांढऱ्या ‘लिटमस’ पेपरचा उपयोग होतो. या पेपरवर पेट्रोलचे दोन थेंब टाकल्यास तो निळा झाल्यास हे पेट्रोल भेसळयुक्त असल्याचे समजते. ‘लिटमस’ पेपरचा रंग न बदलल्यास पेट्रोलमध्ये भेसळ नसल्याचे प्रमाणित होते.