पेट्रोल, डिझेल, खतांच्या किमती गगनाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:13 IST2021-03-16T04:13:31+5:302021-03-16T04:13:31+5:30
मोर्शी : शेतीच्या एकूण उत्पादन खर्चात रासायनिक खतांवर होणाऱ्या खर्चाचा वाटा जवळपास २० टक्के आहे. एप्रिल २०२१ पासून ...

पेट्रोल, डिझेल, खतांच्या किमती गगनाला!
मोर्शी : शेतीच्या एकूण उत्पादन खर्चात रासायनिक खतांवर होणाऱ्या खर्चाचा वाटा जवळपास २० टक्के आहे. एप्रिल २०२१ पासून केंद्र शासनाने खतांच्या किमतींमध्ये जवळपास २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रति बॅग जवळपास २०० ते ३०० रुपये किंमत वाढणार आहे. आधीच महागाई वाढत आहे, त्यातच आता खतांच्याही किमती वाढल्याने शेतकरी चिंतित आहेत. शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या दरांत सातत्याने वाढ होत आहे. या आठवड्यात पेट्रोल, डिझेल दरवाढीने तर कहरच केला आहे. सध्या जवळपास ९९ रुपये प्रतिलिटर पेट्रोल, तर डिझेलही ९० रुपयांवर पोहोचले आहे. पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे होणाऱ्या विविध कामांचीदेखील भाडेवाढ झाली आहे. मशागतीसाठी लागणाऱ्या वाहनांचे दर डिझेल दरवाढीमुळे अडीच ते तीन हजार रुपयांनी वाढले आहेत. इंधन दरवाढीमुळे अत्याधुनिक पद्धतीने शेती मशागत करण्यासाठी मागील वर्षापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत. शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा इंधन दरवाढीमुळे उत्पादन खर्च जास्त वाढला आहे. वाढलेल्या महागाईमुळे व शेतमालाला मिळणाऱ्या अत्यल्प भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे शेती व्यवसाय नकोच, अशी धारणा शेतकऱ्यांची झाली आहे.
कोट १
अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा पुन्हा रासायनिक खतांचे दर वाढल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांचे दर वाढले असल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना असे झाले आहे.
- नरेंद्र जिचकार,
तालुकाध्यक्ष, राकाँ, मोर्शी
कोट २
इंधनाचे दर दिवसागणिक नवे उच्चांक प्रस्थापित करीत असताना शेतीची मशागत करणेसुद्धा महाग झाले आहे. पाठोपाठ शेतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या खतांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे शेतकरी चिंतित झाला आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- रूपेश वाळके,
उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, मोर्शी तालुका
कोट ३
सततच्या दुष्काळाचा विचार करता शेतकऱ्यांना खताच्या दरवाढीचा बोजा न परवडणारा आहे. दुष्काळामुळे शेतकरी सर्व बाजूंनी अडचणीत आला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली खतांची किंमत थांबविणे गरजेचे आहे.
- प्रकाश विघे
संचालक, बाजार समिती मोर्शी.
बॉटम पान २