निवासस्थान ते कार्यालयापर्यंतच वाहन वापरण्यास मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:29 IST2020-12-16T04:29:38+5:302020-12-16T04:29:38+5:30
अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ...

निवासस्थान ते कार्यालयापर्यंतच वाहन वापरण्यास मुभा
अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. ही बाब लक्षात घेता, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला असलेली शासकीय वाहने केवळ पदाधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थान ते कार्यालयापर्यंतच वापरण्याची परवानगी आहे. वाहनांचा ग्रामपंचायत निवडणुकीत वापर होऊ नये, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने वाहनचालकांना दिल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम ४ डिसेंबर रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार आचारसंहितादेखील लागू झाली आहे. आचारसंहितेचे कुठेही उल्लघंन होऊ नये, याकरिता निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनांचा निवडणूक प्रचारात वापर होणार नाही, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला असलेल्या वाहनांचा वापर केवळ शासकीय कार्यालय ते शासकीय निवासस्थानापर्यंतच करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याव्यतिरिक्त वाहनांचा वापर ग्रामपंचायत निवडणुकीत होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना लेखी स्वरूपात वाहनचालकांना दिल्या आहेत.
बॉक्स
पदाधिकाऱ्यांकडून स्वत:च्या वाहनांचा वापर
ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याकडील शासकीय वाहने मुख्यालयात जमा केलेली आहेत. जरी शासकीय वाहने कार्यालय ते शासकीय निवासस्थानापर्यंत ती वापरण्याची मुभा असली तरी पदाधिकारी स्वत:चे वाहन वापरत असल्याचे ‘मिनी मंत्रालया’त दिसून आले.