पेपरफुटीचा मास्टरमाईंड कर्नाटकातील कलबुर्गीतून अटक
By प्रदीप भाकरे | Updated: March 13, 2024 18:08 IST2024-03-13T18:07:33+5:302024-03-13T18:08:21+5:30
अभिषेक सावरीकर याने पुण्यातून पळ काढला होता. आरोपी अभिषेकनेच पुण्याहून व्हॉट्सॲपवरून अमरावतीच्या परीक्षा केंद्रावरील टीसीएसच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून उत्तरे पाठविली होती.

पेपरफुटीचा मास्टरमाईंड कर्नाटकातील कलबुर्गीतून अटक
अमरावती - मृद व जलसंधारण अधिकारी परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंडला कर्नाटकमधील कलबुर्गी शहरातून अटक करण्यात आली. अभिषेक अजय सावरीकर (३३ वर्ष रा. शिवाजी नगर, सिग्निचर टॉवर, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनने मंगळवारी ही कारवाई केली. याप्रकरणात आतापर्यंत परिक्षार्थीसह एकुण ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, अभिषेक सावरीकर याने पुण्यातून पळ काढला होता. आरोपी अभिषेकनेच पुण्याहून व्हॉट्सॲपवरून अमरावतीच्या परीक्षा केंद्रावरील टीसीएसच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून उत्तरे पाठविली होती.
नांदगावपेठस्थित ड्रिमलॅंड येथील एका खासगी परीक्षा केंद्रावर २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ या कालावधीत मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत मृद व जलसंधारण अधिकारी स्थापत्य या पदाकरीता घेण्यात आलेल्या परिक्षेदरम्यान यश कावरे नामक परिक्षार्थीजवळ त्याच्याकडील झेरॉक्स ॲडमिटकार्डच्या खालील भागात नॉन टेक्नीकलचे ४० व टेक्निकलचे ६० असे एकुण १०० प्रश्नांची उत्तरे ए,बी, सी, डी या स्वरूपात टाईप केल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी नादगांव पेठ येथे पोलिसांनी परिक्षार्थीला ताब्यात घेऊन फसवणूक, फोैजदारी स्वरूपाचा कट व महाराष्ट्र विदयापीठ बोर्ड आणि इतर विशिष्ट परीक्षामधिल गैरप्रकारांचा प्रतिबंध कायदा अधिनियम १९८२ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. यात टीसीएस व परीक्षाकेंद्राशी संबंधित व फिर्यादीलाच आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. त्या अकरा जणांच्या कबुलीतून अभिषेक सावरीकरचे नाव समोर आले होते. त्याला शोधण्यासाठी गुन्हे शाखेचे एक पथक २० दिवसांपुर्वी पुणे येथे देखील गेले होते. मात्र तो पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता. पोलीस आयुक्तांनी त्याला शोधण्यासाठी दिशानिर्देश दिले होते.