ज्यांना दिले कंत्राट त्यांनाच बोलवा प्रचाराला!
By Admin | Updated: October 4, 2014 23:19 IST2014-10-04T23:19:13+5:302014-10-04T23:19:13+5:30
गेल्या पाच वर्षांत शासनाच्या विविध योजना, स्थानिक विकास निधी यांसह अन्य योजनांचा कोट्यवधी रूपयांचा निधी आमदारांनी खेचून आणला. कामे मात्र मतदारसंघातील तुरळक कंत्राटदार वगळता अन्य

ज्यांना दिले कंत्राट त्यांनाच बोलवा प्रचाराला!
गजानन मोहोड - अमरावती
गेल्या पाच वर्षांत शासनाच्या विविध योजना, स्थानिक विकास निधी यांसह अन्य योजनांचा कोट्यवधी रूपयांचा निधी आमदारांनी खेचून आणला. कामे मात्र मतदारसंघातील तुरळक कंत्राटदार वगळता अन्य मतदारसंघ व अन्य जिल्ह्यातील कंत्राटदारांना दिली. त्यांनी देखील कोट्यवधींचा मलिदा लाटला. पण, लहानसहान कामेही मिळाली नाहीत म्हणून दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते उमेदवारांवर नाराज आहेत. प्रचारासाठी नेताजींचा फोन जाताच ‘ज्यांना कामे दिलीत, त्यांनाच प्रचाराला बोलवा’, असे स्पष्ट शब्दांत सुनावत असल्याने उमेदवारांचीही गोची होत आहे.
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. जाहीरसभा, रॅली, बैठकी आदींसाठी कार्यकर्त्यांची गर्दी हवी. उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन दिसायला हवे. यासाठी उमेदवारांचे निकटस्थ जीवाचे रान करीत आहे. वॉर्डप्रमुख, गावप्रमुख, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी येथपासून सगळेच गर्दी जमविण्याच्या मागे आहेत. मात्र, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्याच्या वाट्याला पद, तिकीट येत नाही. किमान लहान-मोठ्या कामांमधून उत्पन्न मिळाले तर घरही चालेल, अशी त्यांची अपेक्षा असते. असे झाल्यास पक्षाला मदत करण्याची त्यांची तयारी असते. मात्र, निवडून आल्यानंतर उमेदवाराला या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा विसर पडतो. अधिक टक्केवारी देणाऱ्या कंत्राटदाराला कामे देण्यात येतात.
या व्यवहारामध्ये आमदारांनाही प्रचंड कसरत करावी लागते. कार्यकर्त्यांशी व्यवहार कसा करावा, हा प्रश्न पडल्याने अन्य कंत्राटदारांनाच कंत्राट दिले जातात. त्यामुळे दुसऱ्या फळातील कार्यकर्ता मात्र हमखास दुखावला जातो. सर्वच मतदारसंघांत कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा भाव वधारला आहे. परंतु काही महत्त्वाकांक्षी कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण दिसून येते. ‘काही कार्यकर्ते तर स्पष्ट बोलत आहेत की, ज्यांना कंत्राट दिले त्यांनाच आता त्यांनाच प्रचारालाही बोलवा. यामुळे उमेदवाराला या नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागत असून भविष्यात भरघोस काही तरी देण्याचे आश्वासनदेखील द्यावे लागत आहे. यातून काय निष्पन्न होते, याचा अंदाज मात्र येत नाही.