शांतता, उत्साह अन् विजयी जल्लोष...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:47 IST2019-05-24T01:47:06+5:302019-05-24T01:47:29+5:30
अमरावती लोकसभेच्या महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा यांचे पक्षकार्यालय हे त्यांचे निवासस्थानच होते. गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या ते पाचव्या फेरीपर्यंत नवनीत राणा पिछाडीवर होत्या. तसे मतमोजणीचे 'अपडेट' येत होते.

शांतता, उत्साह अन् विजयी जल्लोष...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती लोकसभेच्या महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा यांचे पक्षकार्यालय हे त्यांचे निवासस्थानच होते. गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या ते पाचव्या फेरीपर्यंत नवनीत राणा पिछाडीवर होत्या. तसे मतमोजणीचे 'अपडेट' येत होते. त्यामुळे निवडणूक निकालाचे काय होणार? याची चिंता राणा कुटुंबीयांसह समर्थकांनादेखील होती. मात्र, सहाव्या फेरीपासून त्यांनी लिड घेतली ती अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिली. त्यामुळे प्रारंभी कार्तकर्त्यांमध्ये शांतता, उत्साह अन् विजयी जल्लोष असा अनुभव बघावयास मिळाला.
महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांचे लोकसभा निवडणुकीचे मुख्य प्रचार कार्यालय हे इर्विन चौकात होते. परंतु, मतमोजणीच्या दिवशीचे नियंत्रण स्थानिक शंकरनगर येथील आ. रवि राणा यांच्या निवासस्थानाहून चालले. १८ एप्रिल रोजी झालेल्या मतदानानंतर नवनीत राणा यांचा विजय पक्का मानला जात होता. मात्र, मतमोजणीचे फेरीनिहाय निकाल येत असताना पाचव्या फेरीपर्यंत राणा समर्थकांच्या चेहऱ्यांवर निरूउत्साह दिसत होता. सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत हीच स्थिती होती. घरी आतमध्ये राणा कुटुंबीय टीव्हीसमोर होते आणि बाहेर हॉलमध्ये समर्थक कार्यकर्ते व पदाधिकारी टीव्हीसमोर निकालाकडे लक्ष ठेवून होते. मात्र, सहाव्या फेरीचे निकाल जाहीर होताच नवनीत यांनी निकालात आघाडी घेतली. त्यानंतर शांतता धारण केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. हळूहळू मताधिक्य वाढत गेले. राणांच्या निवासस्थानी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइं कार्यकर्त्यांची गर्दी होत गेली. घराच्या बाहेरील बाजूस डिजिटल स्क्रिन लावला होता. त्यावर अमरावती लोकसभा निवडणुकीचे निकाल दाखविले जात होते. दरम्यान मताधिक्य वाढत असताना नवनीत राणांना विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘गंगा-सावित्री’वर प्रचंड गर्दी जमली. यावेळी समर्थकांनी राणा कुटुंबीयांना पेढे भरविले. फटाक्यांची आतषबाजी, जल्लोष अन् कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर नृत्याचा फेर धरला. गाव-खेड्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी राणा कुटुंबीय तितक्याच तत्परेने सामोरे जात होते. मात्र, या शुभेच्छा स्वीकारताना क्षणभर नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. शुभेच्छांच्या वर्षावसाठीची गर्दी ही उशिरा रात्रीपर्यंत कायम होती, हे विशेष.
असा वाढत गेला कार्यकर्त्यांचा उत्साह
मतमोजणी गुरूवारी सकाळी ८ वाजेपासून प्रारंभ झाली. अगोदर पाचव्या फेरीपर्यंत शिवसेनेचे आनंदराव अडसूळ पुढे होते. परंतु सहाव्या फेरीचे निकाल दुपारी दीड वाजता जाहीर होताच महाआघाडीच्या नवनीत राणा यांनी जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर काहीशे शांततामय झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये चेतना निर्माण झाली. सहावी, सातवी आणि अखेरच्या १८ व्या फेरीपर्यंत नवनीत राणा आघाडीवरच होत्या. मात्र, सायंकाळी ५ वाजेनंतर विजय निश्चित समजताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.