वीजबिल भरायचे की, कर्जाची परतफेड करायची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:07 IST2021-03-29T04:07:40+5:302021-03-29T04:07:40+5:30
शेतकरी वर्गात संभ्रमावस्था, वीजपुरवठा खंडित होण्याची भीती चांदूर बाजार : वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना आजाराने शेतमालाचे भाव पडले. अस्मानी ...

वीजबिल भरायचे की, कर्जाची परतफेड करायची?
शेतकरी वर्गात संभ्रमावस्था, वीजपुरवठा खंडित होण्याची भीती
चांदूर बाजार : वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना आजाराने शेतमालाचे भाव पडले. अस्मानी व सुलतानी संकटाने भरडून गेलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. थकीत वीज देयके भरावे की, नियमित कर्ज असा संभ्रम त्यांच्यात निर्माण झालेला आहे.
सन २०२० च्या मार्चपासून मानगुटीवर बसलेल्या कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना बसला आहे. आता कोरोनाची दुसरी लाटदेखील डोक्यावर घोंगावत आहे. यात नियमित कर्ज भरणाऱ्यांना अनुदान व कर्जाच्या परतफेडीसोबतच वीजपुरवठा खंडित झाल्यास काय, असा प्रश्न सतावत आहे. गतवर्षी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी घोषित केलेले अनुदान अद्यापही मिळालेले नसल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पाठवलेले अवाजवी कृषी व घरगुती वीज देयके भरावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सुरुवातीला शासनातर्फे वीजबिल माफीबाबत चर्चा होती. आता वाढलेले वीजबिल भरणे शक्य नसल्यामुळे वीजबिल भरायचे आणि तेही वेळेच्या आत, अन्यथा वीज कनेक्शन कापले जातील, असा फतवा सरकारने काढला आहे.
बँकांकडूनही तगादा
मागील हंगामात घेतलेल्या कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी कर्जदारांना तगादा लावणे सुरू केले आहे. कोरोना महामारीमुळे पैशाची आवक नाही. वीजबिल भरले तर थकीत कर्जदार होण्याची भीती. कर्जाची परतफेड केली तर वीज कनेक्शन खंडित होण्याची भीती, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांनी घरातील दागिने विकून, गहाण ठेवून, नातेवाइकांकडून उसणे पैसे घेऊन कर्जाची परतफेड केली. मात्र, वर्षभराचा कालावधी लोटला तरी अनुदानाचा पत्ता नाही.
----------------------