पाण्यासाठी पुसलावासी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 23:22 IST2017-09-21T23:20:57+5:302017-09-21T23:22:25+5:30
पुसला येथे भरपावसाळ्यात मागील १४ दिवसांपासून पाणीटंचाई सोसावी लागत असल्याने संतप्त ग्रामस्थांचा रोष उफाळून आला आणि त्यांनी थेट ग्रामपंचायतीवर धडक देऊन राडा केला.

पाण्यासाठी पुसलावासी आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसला : पुसला येथे भरपावसाळ्यात मागील १४ दिवसांपासून पाणीटंचाई सोसावी लागत असल्याने संतप्त ग्रामस्थांचा रोष उफाळून आला आणि त्यांनी थेट ग्रामपंचायतीवर धडक देऊन राडा केला. मात्र, पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांसह सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामपंचायतीत पोहोचल्याने बाकाप्रसंग टळला.
पुसला हे १५ हजार लोकवस्तीचे गाव आहे. मातब्बर राजकारण्यांचे हे गाव समजले जाते. परंतु येथे अनेक गैरसोयी आहेत. विशेष म्हणजे येथील पेयजलचा प्रश्न, तर नेहमीच ऐरणीवर असतो. यंदासुद्धा उन्हाळयापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिक पाणीटंचाईला कंटाळले आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास ग्रामपंचायत अयशस्वी ठरत आहे. मागील १४ दिवसांपासून गावाला पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक संतप्त झाले होते अखेर ग्रामस्थांचा असंतोष उफाळून आला.
गुरुवारी सकाळी ११ वाजता शेकडोे ग्रामस्थ ग्रामपंचायतीवर चालून गेले. यावेळी ग्रापंमध्ये केवळ सचिव उपस्थित होते. नियमीत पाणी पुरवठा करा अन्यथा राजीनामे द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. नागरिकांचा असंतोष पाहता मोठा राडा होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेंदूरजनाघाटचे ठाणेदार शेषराव नितनवरे पोलीस ताफ्यासह घटनास्थळावर पोहोचले. पोलीस पोहोचल्याचे पाहून सरपंच आणि उपसरपंचही पोहोचले. पोलिसांसह गटविकास अधिकारी राठोड यांनी नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ग्रामस्थांचा रोष कमी झाला.