अशासकीय प्रशासक मंडळाच्या हालचालींना वेग
By Admin | Updated: August 1, 2014 00:03 IST2014-08-01T00:03:39+5:302014-08-01T00:03:39+5:30
सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर असलेल्या शासकीय प्रशासकांना बसविण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे.

अशासकीय प्रशासक मंडळाच्या हालचालींना वेग
अमरावती बाजार समिती : इच्छुक पुढारी लागले कामाला
जितेंद्र दखने - अमरावती
सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर असलेल्या शासकीय प्रशासकांना बसविण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. यामध्ये वर्णी लागावी यासाठी अनेक इच्छुक पुढाऱ्यांनी आपआपल्या राजकीय गॉडफादरमार्फत जोरदार 'लॉबींग' सुरु केली आहे.
जिल्ह्यातील बारा कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी सध्या अचलपूर, अमरावती आणि अंजनगाव सुर्जी या तीन कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासकीय प्रशासक कार्यरत आहेत. तर नांदगाव खंडेश्वर व तिवसा बाजार समीतीवर अशासकीय प्रशासक मंडळ कार्यरत आहे व वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे, दर्यापूर आणि धारणी या सात बाजार समितींवर विद्यमान संचालक मंडळ कार्यभार सांभाळत आहेत. यापैकी दर्यापूर आणि वरुड बाजार समितीच्या संचालक मंडळाची येत्या आॅगस्ट महिन्याअखेर कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने या बाजार समित्यांवर शासकीय प्रशासक नियुक्त केलेजाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, तिवसा, अचलपूर, अमरावती, अंजनगाव सुर्जी या पाच बाजार समितींच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे १० एप्रिल २०१४ नंतर राज्य शासनाने या बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिन्यांपर्यंत पुढे ढकलल्यामुळे येथील प्रशासक हटवून अशासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी शासनस्तरावर राजकीय पुढाऱ्यांनी अशासकीय प्रशासक मंडळाची मांगणी रेटून धरली याची दखल घेत शासन स्तरावरुन जिल्हा निबंधकांना प्रस्ताव मागविण्यात आले. यामध्ये अमरावती, अचलपूर, अंजनगाव सुर्जी या तीन बाजार समितींचा समावेश आहे. या समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ निवडीच्या हालचाली तेज होताच राजकीय गॉडफादर कडे जोरदार लॉबींग सुरु केले असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा निबंधकांनी संबंधीत तालुक्याचे सहायक निबंधक यांच्या मार्फत पडताळणी प्रस्ताव मागवून हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती आहे. राजकीय हालचालींना वेग आल्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्र ढवळून निघाले आहे.