वाहून गेलेल्या युवकांच्या घरी आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST2019-09-14T06:00:00+5:302019-09-14T06:00:53+5:30
गौरखेडाच्या वीर शिवाजी तरुण उत्साही मंडळाने वाठोडा येथील पूर्णा नदीपात्रावर गणेशमूर्ती आणली होती. तेथे विसर्जनादरम्यान ऋषीकेश वानखडे, सतीश सोळंके, सागर शेंदूरकर व संतोष वानखडे हे वाहून गेले. शुक्रवारी संतोष वानखडे व सागर शेंदूरकर यांचे मृतदेह सापडल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.

वाहून गेलेल्या युवकांच्या घरी आक्रोश
सचिन मानकर/धीरज राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी वाठोडा शुक्लेश्वर येथे गेलेले चौघे पूर्णामायच्या प्रवाहात वाहून गेल्याचे वृत्त धडकल्यापासून तालुक्यातील गौरखेडा येथील वॉर्ड १ मध्ये शोककळा पसरली आहे. दुसºया दिवशी शुक्रवारी गावात चुली पेटल्या नाहीत. वाहून गेलेल्या चौघांपैकी दोन विद्यार्थी होते. पुतण्याला वाचविण्यासाठी नदीत उडी घेणारा काकादेखील वाहून गेला.
गौरखेडाच्या वीर शिवाजी तरुण उत्साही मंडळाने वाठोडा येथील पूर्णा नदीपात्रावर गणेशमूर्ती आणली होती. तेथे विसर्जनादरम्यान ऋषीकेश वानखडे, सतीश सोळंके, सागर शेंदूरकर व संतोष वानखडे हे वाहून गेले. शुक्रवारी संतोष वानखडे व सागर शेंदूरकर यांचे मृतदेह सापडल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. वाहून गेलेले उर्वरित दोघे जिवंत असावे, अशी मनोमन प्रार्थना प्रत्येक गावकरी करीत आहे. मात्र, पूर्णा नदीचे पात्र फुगल्याने ही शक्यता कमीच आहे. प्रवाहाचा शोधमोहिमेतही अडथळा झाला आहे.
प्रथम सापडला संतोषचा मृतदेह
संतोष वानखडे (४५) यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी जिल्हा शोध व बचाव पथक आणि पोलिसांनी शुक्लेश्वर घाटावरून पात्राबाहेर काढला. पुतण्या ऋषीकेशला वाचविण्यासाठी त्यांनी नदीपात्रात उडी घेतली होती. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. आई, पत्नी, ११ वर्षांचा मुलगा व आठ वर्षाची मुलगी असे कुटुंबीय त्यांच्या पश्चात आहेत.